अवकाळीने कोल्हापूर शहराला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 10:25 IST2021-01-07T10:23:53+5:302021-01-07T10:25:48+5:30
Rain Kolhpaur-कोल्हापूर शहराला बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. सुमारे पाऊण तास एकसारखा पाऊस राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

अवकाळीने कोल्हापूर शहराला झोडपले
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. सुमारे पाऊण तास एकसारखा पाऊस राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेली तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपासून आकाश काहीसे स्वच्छ झाल्याने सूर्यनारायणाने नेहमीप्रमाणे दर्शन दिले होते. दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर आकाश स्वच्छ झाल्याने पाऊस गेला असेच वाटले. मात्र सायंकाळी सहानंतर आकाश दाटून आले आणि साडेसात वाजता पावसास सुरुवात झाली.
जोरदार पाऊस सुरू झाला, सुमारे पाऊण तास पाऊस सुरू असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. अनेकांना भिजतच घरी परतावे लागले. रात्री साडेनऊपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणेवर परिणाम झाला असून, गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत.