पुनर्वसनाचे काम नाही तोपर्यंत उचंगीच्या घळभरणीचे काम बंदच, धरणग्रस्तांचा लढा परिषदेत निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 19:19 IST2022-02-01T19:18:59+5:302022-02-01T19:19:15+5:30
येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी उचंगी प्रकल्प स्थळावर येऊन धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार

पुनर्वसनाचे काम नाही तोपर्यंत उचंगीच्या घळभरणीचे काम बंदच, धरणग्रस्तांचा लढा परिषदेत निर्धार
आजरा : पुनर्वसन कायद्याप्रमाणे उचंगी (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाच्या घळभरणीचे काम करू देणार नाही. असा निर्धार आज धरण स्थळावर झालेल्या धरणग्रस्तांच्या लढा परिषदेत घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी उचंगी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ केली तर आंदोलनाची व्याप्ती वाढवून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडतील असा इशारा राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष व वारणा संग्राम संघटनेचे अध्यक्ष गौरव नाईकवडे यांनी दिला.
लढा परिषदेसाठी धरणग्रस्त घराला कुलूप लावून धरण स्थळावर आले होते. यावेळी काॅ. संजय तरडेकर यांनी उचंगीच्या पुनर्वसनाची शेवटची व निकराची लढाई लढू या असे आवाहन केले. तर, धरणग्रस्तांच्या गावठाणमध्ये वीज, पाणी, रस्ते यासह नागरी सुविधा नसल्यामुळे प्लॉट न घेण्याचा परिषदेत निर्धार करण्यात आला. तसेच पुनर्वसनासाठी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे.
.. येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी उचंगी धरणस्थळावर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार आज, उचंगी धरणस्थळाला भेट देणार होते. मात्र आज धरणग्रस्तांची लढा परिषद असल्यामुळे शुक्रवार दि.४ फेब्रूवारीला दुपारी ४ वा. ते प्रकल्प स्थळावर येऊन धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहेत.