कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा सत्र न्यायालयात साक्ष असल्याने २८ मार्चला गेलो होतो. मात्र, न्यायालयात जाण्यापासून पोलिसांनी मला रोखून विनाकारण कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. ही मारहाण जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप करून त्याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिसांत तत्काळ दाखल करावी, अशा मागणीचे निवेदन जयदीप विश्वासराव शेळके (वय ५३, रा. छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दिले.निवेदनात म्हटले आहे की, प्रशांत कोरटकर याचा निषेध केल्याप्रकरणी २५ मार्चला पोलिसांनी मला नोटीस बजाविली होती. त्याची साक्ष देण्यासाठी २८ मार्चला फौजदारी न्यायालयात जात असताना न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अडवून आत जाण्यास प्रतिबंध केला. न्यायालयात साक्ष असल्याचे सांगूनही दहा ते बारा पोलिसांनी मारहाण करून शर्ट फाडला. शिवीगाळ करत आम्हाला जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई केल्याचे सांगितले. त्यानंतर अलंकार हॉलमध्ये नेऊन रात्री सोडून दिले. याप्रकरणी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून सीपीआरमध्ये पोलिस चौकीत तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. तक्रार अर्ज पोलिस महासंचालकांनाही दिला आहे. अर्जाची दखल घेऊन संबंधितांवर गु्न्हा दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शेळके यांनी दिला.
कोरटकर प्रकरणात पोलिसांकडून विनाकारण मारहाण; जयदीप शेळके यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:55 IST