पणती पेटणार, कमळ फुलणार, सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे अनोखे फंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:42 IST2019-02-09T13:40:00+5:302019-02-09T13:42:28+5:30
दारामध्ये लावलेल्या पणतीतून कमळ फुलण्यापासून ते मोदींच्या पोस्टरसमोर सेल्फी काढण्यापर्यंत, भाजपला पाच रुपयांची मनिआॅर्डर करण्यापासून ते घरावर भाजपचे झेंडे लावण्यापर्यंतचे अनोखे फंडे राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

कळंबा (ता. करवीर) येथे झालेल्या भाजपच्या शक्तिप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये आमदार सुरेश हाळवणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबा देसाई, हिंदुराव शेळके, के. एस. चौगुले, प्रवीणसिंह सावंत उपस्थित होते.
कळंबा/कोल्हापूर : दारामध्ये लावलेल्या पणतीतून कमळ फुलण्यापासून ते मोदींच्या पोस्टरसमोर सेल्फी काढण्यापर्यंत, भाजपला पाच रुपयांची मनिआॅर्डर करण्यापासून ते घरावर भाजपचे झेंडे लावण्यापर्यंतचे अनोखे फंडे राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
लोकसभेच्या तोंडावर जिल्हा पातळीवर सर्व शक्तिप्रमुखांच्या बैठका घेण्याचे सत्र भाजपने सुरू केले असून, असाच एक मेळावा शुक्रवारी दुपारी कळंबा (ता. करवीर) येथे पार पडला. या ठिकाणी या सर्व अनोख्या योजनांबाबत कार्यक र्त्यांना माहिती देण्यात आली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा समर्पण दिन म्हणून ११ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सकाळी १० वाजता ‘नमो अॅप’च्या माध्यमातून पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतचा निधी भाजपला आॅनलाईन पाठवायचा आहे. ‘आम्ही केवळ व्होट देणार नाही; तर पक्षासाठी नोटही देऊ,’ अशी भावना यातून प्रबळ करण्यात येणार आहे.
दुसऱ्याच दिवशी १२ फेब्रुवारीला ‘माझा परिवार, भाजपा परिवार’ या अभियानांतर्गत घरावर भाजपचे झेंडे लावण्यात येणार आहेत. याच दिवशी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या परिवाराने पक्षाकडून पुरविण्यात आलेल्या पोस्टरसमोर उभे राहून फोटो काढून तो आॅनलाईन पाठवायचा आहे.
तसेच २६ फेब्रुवारीला मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून, खेड्यामध्ये ६० किलोमीटर आणि शहरामध्ये ५० किलोमीटर रॅली काढली जाईल. याच दिवशी संध्याकाळी ‘कमळज्योती’ उपक्रमांतर्गत भाजपला मानणाऱ्या घरांसमोर पणती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही पणती पेटली की तिच्यातून कमळ फुलणार आहे. पक्षाकडूनच या पणत्या पुरविण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून सर्वसामान्यांशी असलेले भाजपचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी भाजपने या अनोख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे.
कळंबा येथे झालेल्या या मेळाव्यामध्ये भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, शिवाजी बुवा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. एस. चौगुले, डॉ. अजय चौगुले, विजया पाटील, अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, अनिता चौगुले, मनीषा टोणपे, अनिल यादव, गोपाळराव पाटील यांच्यासह भाजपचे नगराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने शक्तिप्रमुख उपस्थित होते.