भाविकांच्या अनुपस्थितीतही अंबाबाईच्या चरणी अखंड सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 14:11 IST2020-10-21T14:09:23+5:302020-10-21T14:11:08+5:30
Navratri, Mahalaxmi Temple Kolhapur सालंकृत पूजेने सजलेली अंबाबाई, विद्युत रोषणाईने झगमगलेल्या मंदिरात एकटीच उभी आहे, जणू भक्तांच्या प्रतीक्षेत. यंदा भक्तांसाठी तिचे दरवाजे बंद असले तरी नवरात्रौत्सवात भक्तांकडून केली जाणारी सेवा आता श्रीपूजकांसह देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच केली जात आहे.

कोरोनामुळे यंदा भाविकांना कोल्हापुरातील अंबाबाईसमोर गायनसेवा देता येत नाही. मात्र ही कसर भरून काढत पुजाऱ्यांसह देवस्थानचे कर्मचारी रोज देवीसमोर भजनांसह भक्तिगीते सादर करतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)
इंदुमती गणेश
कोल्हापूर : सालंकृत पूजेने सजलेली अंबाबाई, विद्युत रोषणाईने झगमगलेल्या मंदिरात एकटीच उभी आहे, जणू भक्तांच्या प्रतीक्षेत. यंदा भक्तांसाठी तिचे दरवाजे बंद असले तरी नवरात्रौत्सवात भक्तांकडून केली जाणारी सेवा आता श्रीपूजकांसह देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच केली जात आहे. देवीसमोर गायन-वादन असो वा पालखी सोहळ्यातील लवाजमा; नायकिणीचं गाणं असो किंवा देवीसोबतच चालणारे रोषणनाईक; या सगळ्या सेवेकऱ्यांकडून देवीचा उत्सव पार पाडला जात आहे.
नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर भाविकांनी गजबजलेले असते. सिद्धिविनायक मंदिरासमोर सकाळी सहा वाजल्यापासून देवीस्तुतीसह दिवसभर भक्तिगीते, भजन, कीर्तन, भरतनाट्यम, कथ्थक, गोंधळ यांसह लोककला सादर होतात. रात्री साडेदहापर्यंत देवीचा जागर सुरू असतो. यंदा मात्र भाविक नसल्याने मंदिरात अस्वस्थ करणारी शांतता आहे. या शांततेला छेद देत उत्सवाचा रंग भरण्याचा प्रयत्न मंदिरातील पुजाऱ्यांसह देवस्थानचे कर्मचारी करीत आहेत.
एरवी नवरात्रात क्षणाचीही उसंत नसते. यंदा सगळेच निवांत असल्याने दुपारची आरती झाली की पुजाऱ्यांसह मंदिरात वाजंत्र्यांची जबाबदारी असलेले नगारखान्यातील कर्मचारी कासव चौकात येऊन बसतात. प्रत्येकाला वेळ मिळेल त्याप्रमाणे ते आपली सेवा देतात. कोणी तबला वाजवतो, कोणी वाजंत्री, कोणी पेटी, कुणाकडे टाळ तर कुणाचा गोड आवाज आहे.
सगळे मिळून देवीसमोर भजन, विविध देवदेवतांची पदे सादर करतात. सनई वाजवणारा अमित साळोखे, खजिनदार महेश खांडेकर, सीसीटीव्हीसह डिजिटल यंत्रणा सांभाळणारे राहुल जगताप, अभिजित पाटील यांच्यासह सफाई कर्मचारीही यात तल्लीन होतात.
अंबाबाईच्या पालखीसमोर भक्तिगीते गाइली जातात. याच प्रदक्षिणेत गाणे सादर करण्याचा मान नायकिणीला असतो. आजही वयस्कर नायकीण देवीसमोर गाणे सादर करते. दिवसभरात पाच वेळा घाटी दरवाजावरील घंटा वाजवणे आणि पालखीला देवीसमोर दंड घेऊन उभारणारा चोपदार, रोषणनाईक, तोफेची सलामी देणारे व मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव असे सगळे कर्मचारी मिळून हा नवरात्रौत्सव पार पाडत आहेत.