पोर्ले तर्फ ठाणे : मर्जीविरोधात भाचीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून मामाने स्वागत समारंभातील जेवणात विष कालवल्याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मामा महेश जोतीराम पाटील (वय ४५, रा. उत्रे, ता.पन्हाळा) यांना बुधवारी सायंकाळी पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पंधरा जणांचे जबाब तपासले आहेत. त्याचबरोबर विष कालवलेल्या अन्नपदार्थाचे नमुने घेतले असून औषधाची बाटली आणि संशयितांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामाकडे राहणाऱ्या भाचीने गावातील तरूणाशी प्रेमविवाह केला होता. मंगळवारी (दि.७) गावातील एका मंगल कार्यालयात भाचीच्या लग्नाचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पाहुण्यांसाठी जेवण बनविलेल्या भांड्यात त्यांनी विष टाकून कार्यक्रमातील लोकांच्या जीवितास धोका पोहोचविण्याच्या उद्देशाने महेशने कृत्य केल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली.याबाबत नवरदेवाच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेल्या महेश पाटील स्वत:हून बुधवारी सायंकाळी पन्हाळा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याच बरोबर विष कालवलेल्या अन्न पदार्थाचे नमुने व विषारी द्रव पदार्थाची बाटली जप्त केली आहे. संशयित आरोपीस उद्या न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Kolhapur: भाचीच्या स्वागत समारंभातील जेवणात विष कालवणाऱ्या मामाला अटक, मर्जीविरोधात लग्न केल्याच्या रागातून कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:12 IST