Unaided school; Protests by government against Satyanarayana worship | विनाअनुदानित शाळा; सत्यनारायण पूजा घालून सरकारचा निषेध
कोल्हापुरात गुरुवारी राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्री सत्यनारायणाची पूजा घालून सरकारचा निषेध करण्यात आला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देसत्यनारायण पूजा घालून सरकारचा निषेध; विनाअनुदानित शाळा कृती समितीचा मूक मोर्चा

कोल्हापूर : प्रतीकात्मक श्री सत्यनारायण पूजा घालून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा गुरुवारी निषेध व्यक्त केला. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

वीस टक्के अनुदानपात्र सर्व शाळांना १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्द करून प्रचलित नियमांनुसार अनुदान द्यावे. अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, वर्गतुकड्या निधीसह घोषित कराव्यात, सेवा संरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी या कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे.

उपोषण करणाऱ्यां शिक्षकांच्या समर्थनार्थ इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी विविध स्वरूपांतील आंदोलने करीत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी गुरुवारी प्रतीकात्मक श्री सत्यनारायणाची पूजा आणि महिला शिक्षकांनी हळदी-कुुंकवाचा कार्यक्रम आणि भजन करीत सरकार आणि शासनाचा निषेध केला.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षक पांडुरंग पाटील, नारायण पारखे, सचिन कांबळे, उत्तम जाधव यांनी उपोषण सुरू केले आहे. त्याच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता समितीच्या वतीने मूक आंदोलन केले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी गुरुवारी दिली.

 

 

 


Web Title: Unaided school; Protests by government against Satyanarayana worship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.