बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या ‘राज’ यांच्यासोबत ‘उद्धव’ यांनी जाऊ नये - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:39 IST2025-07-16T19:38:58+5:302025-07-16T19:39:37+5:30

जनसुरक्षा कायदा महत्वाचाच..

Uddhav Thackeray should not go with Raj Thackeray who opposed Balasaheb says Ramdas Athawale | बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या ‘राज’ यांच्यासोबत ‘उद्धव’ यांनी जाऊ नये - रामदास आठवले 

बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या ‘राज’ यांच्यासोबत ‘उद्धव’ यांनी जाऊ नये - रामदास आठवले 

कोल्हापूर : उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. पण, बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारे ‘राज’ यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी जाऊ नये, असे माझे मत असल्याची माहिती ‘रिपाई’नेते व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. कोल्हापुरात १६ नोव्हेंबरला बौद्ध धर्म परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रामदास आठवले हे मंगळवारी अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. आठवले म्हणाले, मुंबईत ६० टक्के अमराठी तर ४० टक्के मराठी मतदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक भाषिकांना सोबत घेऊन काम केले. मराठी प्रत्येकाने शिकली पाहिजे, म्हणून कोणी दादागिरी करू नये.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जाणार असून यामध्ये ‘रिपाई’ही सहभागी राहणार आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगोदरपासून आम्ही महायुतीमध्ये असताना आम्हाला राज्यात मंत्रीपद, महामंडळ दिलेले नाही. त्यामुळे समाज नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनसुरक्षा कायदा महत्वाचाच..

नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणणं महत्त्वाचं होते. हा कायदा संविधान विरोधी नसून या कायद्यानंतर अन्याय होत असेल तर त्यामध्ये बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे आठवले यांनी सांगितले.

गायकवाड यांच्यावरील हल्ला चुकीचाच

प्रवीण गायकवाड आमचे चांगले मित्र आहेत. शाहू, फुले, आंबेडकरवादी विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक वेळा आपले विचार मांडले आहेत. त्यांच्यावर शाईफेक हल्ला चुकीचाच असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray should not go with Raj Thackeray who opposed Balasaheb says Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.