कोल्हापूर : उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांना मंगळवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून भेटीसाठी ‘मातोश्री’वर बोलावले आहे. आज, बुधवारी दुपारी १२ वाजता पवार यांची भेट होणार आहेत. यासाठी त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारीही मंगळवारी मुंबईला रवाना झाले.उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख निवडीवरून पक्षात नाराजी उफाळून आली आहे. सोमवारी शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी पदाचा राजीनामा देत थेट शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ उपनेते संजय पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत उपनेतेपदाचा राजीनामा देण्याची घाेषणा केली. ऐन महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर अंतर्गत नाराजी पक्षाला परवडणारी नाही. पवार यांच्या राजीनाम्याची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली.
मंगळवारी सकाळी आमदार सुनील प्रभू यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना फोन जोडून देऊन संजय पवार यांच्याशी चर्चा घडवून आणली. पवार यांना तातडीने मुंबईला येण्यास ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार पवार हे मंगळवारी दुपारी मुंबईला रवाना झाले असून, बुधवारी दुपारी बारा वाजता मातोश्रीवर जाऊन ते ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही आहेत.
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, हे यापूर्वीच सांगितले आहे. हनुमंताची रामावर जेवढी भक्ती होती, तेवढीची भक्ती आपली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यांनी मला मुंबईला बोलावले आहे, त्यांच्या सोबतच्या भेटीत सर्व गोष्टींवर चर्चा होईल. - संजय पवार, उपनेते, उद्धवसेना