कारच्या धडकेत निगवे दुमाला येथील दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:39 IST2019-08-21T18:38:16+5:302019-08-21T18:39:06+5:30
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर आंबेवाडीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सहदेव पांडुरंग जासूद (वय ५१, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री झाला.

कारच्या धडकेत निगवे दुमाला येथील दुचाकीस्वार ठार
कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर आंबेवाडीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सहदेव पांडुरंग जासूद (वय ५१, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री झाला.
पोलिसांनी सांगितले, सहदेव जासूद हे कामानिमित्त कोल्हापूरला आले होते. मंगळवारी रात्री ते आपल्या दुचाकी (एमएच ०९ एएस ७१५) वरून निगवे दुमाला गावी चालले होते. आंबेवाडी गावच्या हद्दीमध्ये येताच पन्हाळ्याकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या कार (एमएच १२ ईयू ५६७)ने समोरून त्यांना धडक दिली. त्यामध्ये डोक्याला, दोन्ही पायांना, हाताला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले.
या मार्गावरील वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेत त्यांना सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कारचालक न थांबता पळून गेला. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्याच्या कारचा नंबर पोलिसांनी मिळविला.
अपघातामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती नातेवाईक,मित्रपरिवारास मिळताच त्यांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातेवाईक असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.