Kolhapur: जोतिबा डोंगर देवराईने नटणार..पुनर्रोपणाने २ हजार झाडांना नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:58 IST2025-12-19T11:56:55+5:302025-12-19T11:58:12+5:30
‘दख्खन केदारण्य’ उपक्रमातून होणार कायापालट

Kolhapur: जोतिबा डोंगर देवराईने नटणार..पुनर्रोपणाने २ हजार झाडांना नवसंजीवनी
कोल्हापूर : श्री जोतिबा डोंगराचे प्राचीन आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा मिळावे, यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्यावतीने ‘दख्खन केदारण्य’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा गुरुवारी शुभारंभ झाला. याअंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण करून या मोहिमेला गती देण्यात आली. याअंतर्गत तब्बल दोन हजार मोठ्या वृक्षांना नवसंजीवनी मिळणार असून, डोंगर पुन्हा एकदा घनदाट देवराईने नटणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. कोरे यांनी महामार्गांच्या कामात अडथळा ठरणारी २० वर्षे ते १०० वर्षांपूर्वीची मोठी झाडे तोडून नष्ट करण्याऐवजी, ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, कागल आणि रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून काढलेल्या पहिल्या १० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण आज केले आहे. यानंतर तातडीने २०० झाडांचे तातडीने पुनर्रोपण तसेच भविष्यात ही संख्या २ हजारांपर्यंत नेली जाईल. देवस्थानच्या मालकीच्या ३० एकर क्षेत्रांत हा प्रकल्प साकारला जात आहे.
यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प चंद्रकांत आयरेकर, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह अनेक अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.