तवंदी घाटातील अपघातात मिठारवाडीचे दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:50+5:302020-12-15T04:41:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : बेळगावहून कोल्हापूरकडे जात असलेल्या ट्रकने बेळगावच्या दिशेने निघालेल्या ट्रकला दुभाजक ओलांडून जोराची धडक ...

तवंदी घाटातील अपघातात मिठारवाडीचे दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : बेळगावहून कोल्हापूरकडे जात असलेल्या ट्रकने बेळगावच्या दिशेने निघालेल्या ट्रकला दुभाजक ओलांडून जोराची धडक दिली. या अपघातात दोनजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. सागर तुकाराम जगताप (वय ३५) व नाना दत्तू पाटील (५०, दोघेही रा. मिठारवाडी, ता. पन्हाळा) हे ठार झाले, तर मोहम्मद जरीन (३८) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात तवंदी घाटात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, मृत चालक सागर हा आपला सहकारी नाना पाटील यांच्यासह ट्रक (एम एच ०९ सी डब्ल्यू २८०९) घेऊन कोल्हापूरहून बेळगावकडे कोळसा भरून निघाला होता. याचवेळी मोहम्मद जरीन हे ट्रक (जीजे २५ यु ४१४९) घेऊन बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने प्लायवूड वाहतूक करीत होते. तवंदी घाटातील एका वळणावर आल्यानंतर मोहम्मदचा ट्रकवरील ताबा सुटला. यानंतर दुभाजक ओलांडून तो विरुद्ध दिशेला गेला. यावेळी समोरून येणाऱ्या सागर यांच्या ट्रकला त्याने समोरून जोराची धडक दिली. या अपघातात सागर व नाना यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहम्मद हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहम्मद यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर एक ट्रक रस्त्यात उलटला होता. यामुळे काही काळ वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती. ट्रकमालक सूरज संजय जाधव (रा. मिठारवाडी) यांनी या घटनेची फिर्याद निपाणी शहर पोलिसांत दिली आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
१४ निपाणी
फोटो
निपाणी : तवंदी घाटातील अपघातातील वाहनांचे मोठे नुकसान झाले.