राधानगरीचे दोन दरवाजे सुरूच, पावसाची मात्र उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:57 IST2020-08-12T17:55:00+5:302020-08-12T17:57:48+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा, आजरा, शाहूवाडी तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप सुरूच आहेत. दूधगंगा व वारणा धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दूधगंगा, वेदगंगेची पातळी थोडी वाढली असून पंचगंगेची पातळी कमी झाली आहे.

राधानगरीचे दोन दरवाजे सुरूच, पावसाची मात्र उघडझाप
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा, आजरा, शाहूवाडी तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप सुरूच आहेत. दूधगंगा व वारणा धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दूधगंगा, वेदगंगेची पातळी थोडी वाढली असून पंचगंगेची पातळी कमी झाली आहे.
बुधवारी सकाळी हातकणंगले, शिरोळ वगळता पावसाची भुरभुर राहिली. सकाळी दहानंतर मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली. कोल्हापूर शहर, करवीर तालुक्यात दुपारी काही काळ ऊन पडले होते. दुपारनंतर पावसाची भुरभुर राहिली. एकूणच दिवसभरात पावसाची उघडझाप राहिली.
गगनबावडा, शाहूवाडी, आजरा तालुक्यात मात्र जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून त्यातून प्रतिसेंकद ४२५६ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वारणा धरणातून सकाळी ६०९३ विसर्ग होता त्यात वाढ करून सायंकाळी सात वाजता ७२०६ घनफुट करण्यात आला. दूधगंगा धरणातूनही ४९०० घनफुट विसर्ग सुरू असल्याने दूधगंगा व वेदगंगा नद्यांची पातळी थोडी वाढली आहे. त्यामुळेच बुधवारी सकाळी २४ बंधारे पाण्याखाली होते, त्यात वाढ होऊन २९ पर्यंत पोहचली. पंचगंगेची पातळी ३४ फुट असून पाणी हळूहळू पात्रात सरकू लागले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २३.५४ मिली मीटर पाऊस झाला. या कालावधीत दहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन २ लाख ९२ हजार रूपयांचे नुकसान झाले.
अतिवृष्टी झालीच नाही
हवामान विभागाने बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र प्रत्येक्षात उघडझापच राहिली.
अलमट्टीतून ४० हजारचा विसर्ग
अलमट्टी धरणात प्रतिसेंकद १ लाख ७४ हजार ११५ घनफुट पाणी येते. मात्र धरणातून ४० हजार ९२२ घनफुटचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी संथ गतीने कमी होत आहे.
धरणातील पाणीसाठा, टीएमसीमध्ये
- राधानगरी - ८.३२.
- तुळशी - २.९५
- वारणा - २९.८८
- दूधगंगा - २२.४५
- कासारी - २.२८
- कडवी - २.३२
- कुंभी - २.२२
- पाटगाव - ३.४८.