कोल्हापूर : नागाळा पार्क येथे एका हॉटेलजवळ थांबलेल्या कारमधून जप्त केलेली १ कोटी ९८ लाख ९९ हजार ५०० रुपयांची रोकड तासगाव (जि. सांगली) येथील सराफ माणिक पाटील यांची असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले. संबंधित रक्कम कोल्हापुरातील काही व्यक्तींकडून घेऊन ती कर्नाटकात उडपी येथे पाठवली जात होती, अशी माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.रात्रगस्तीदरम्यान शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांनी नागाळा पार्कातून एका कारमधील बेहिशेबी रोकड जप्त केली होती. संबंधित रक्कम तासगाव येथील माणिक पाटील या सराफाची असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले. व्यावसायिक कामातून त्यांनी कोल्हापुरातील काही लोकांकडून घेतलेली रक्कम पुढे उडपी येथे पाठवली जाणार होती. रक्कम घेऊन जाणाऱ्यांकडे कागदोपत्री काही पुरावे नसल्याने ती रक्कम नेमकी कशाची आहे, याचे गूढ वाढले होते.पोलिसांनी संबंधित रक्कम आणि ताब्यात घेतलेल्या दोघांना आयकर विभागाकडे सोपवले. आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या तपासानंतर ही रक्कम कायदेशीर की बेकायदेशीर ते स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
कोल्हापुरात जप्त केलेले दोन कोटी तासगावातील सराफाचे, पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:44 IST