वाशीतील दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 06:26 PM2020-12-03T18:26:17+5:302020-12-03T18:27:36+5:30

Crimenews, Court, police, kolhapurnews वाशी (ता. करवीर) येथे कार्यक्रमात जेवणानंतर परंपरेनुसार भांडी घासण्याच्या भाऊबंदकीतील वादातून चुलतभावाचे डोके झाडाच्या कठड्यावर (पारावर) आपटून खून केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

Two brothers from Vashi were sentenced to life imprisonment | वाशीतील दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास

वाशीतील दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावास

Next
ठळक मुद्देचुलतभावाचा खून : दोन वर्षांनी निकालजेवणातील भांडी धुण्यावरून वाद उफाळला

कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे कार्यक्रमात जेवणानंतर परंपरेनुसार भांडी घासण्याच्या भाऊबंदकीतील वादातून चुलतभावाचे डोके झाडाच्या कठड्यावर (पारावर) आपटून खून केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

महादेव मंगेश पुजारी (वय ४४) व अशोक मंगेश पुजारी (४७, दोघेही रा. वाशी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत, तर आण्णाप्पा आप्पाजी पुजारी (४७) असे मृताचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. गुडघे यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, दि. ११ मार्च २०१८ रोजी वाशी (ता. करवीर) येथे बिरदेव मंदिरसमोरील मोकळ्या जागेत पुजारी यांच्या भावकीचा एकत्र जेवणाचा कार्यक्रम होता. समाजाच्या परंपरेनुसार कार्यक्रमानंतर भावकीतील लोकांनी भांडी घासावी लागतात.

घटनेदिवशी रात्री आण्णाप्पा पुजारी हे भांडी घासण्यासाठी जाताना त्यांना मंगेश व महादेव पुजारी यांनी विरोध केला. त्यावरून आरोपी व मृत आण्णाप्पा यांच्यात वादावादी झाली. आरोपींनी आण्णापा यांना पकडून त्यांचे डोके झाडाभोवती सिमेंट-काँक्रीटच्या कठड्यावर (पारावर) जोरजोराने आपटले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे आण्णाप्पा यांच्या मेंदूस दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. भाऊ नानासाहेब पुजारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदविला.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. नानासाहेब पुजारी, सखाराम इराप्पा पुजारी व संजय बाबू काटकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीदारांचा महत्त्वपूर्ण जबाब व सरकारी वकील ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना करवीर पोलीस ठाण्याचे हवलादार महेश वाडकर, पोलीस नाईक एम. एम. नाईक यांनी मदत केली.

 

Web Title: Two brothers from Vashi were sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.