कोल्हापूर : सोडून गेलेल्या पत्नीला मेहुणीने लपविल्याच्या संशयातून मेहुणीच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या सराईत गुंडासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ तासांत निपाणी येथून अटक केली. संतोष सुरेश माळी (वय ३३) आणि प्रथमेश सतीश शिंगे (२५, दोघे रा. नवीन वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.मंगळवारी (दि. ३) दुपारी शाहूनगर येथील मेहुणीच्या घरातून मुलीचे अपहरण करून दोघे पळाले होते. यादवनगरातील सराईत गुंड संतोष माळी याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी महिन्यापूर्वीच घर सोडून निघून गेली आहे. पत्नीला घर सोडून जाण्यासाठी मेहुणीने मदत केल्याच्या संशयातून माळी हा मंगळवारी दुपारी मित्रासह शाहूनगरातील मेहुणीच्या घरी गेला. जबरस्तीने मेहुणीची मुलगी पायल हिला दुचाकीवरून घेऊन निघून गेला. पत्नीला समोर आणली नाही तर, मुलीला ठार मारू अशी धमकी त्याने दिली होती.याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पथकांनी संशयितांचा शोध सुरू केला. निपाणीच्या दिशेने संशयित गेल्याचे समजताच पोलिसांचे एक पथक मागावर गेले. तवंदी घाटात प्रथमेश शिंगे सापडताच त्याची चौकशी केली. संतोष माळी हा मुलीला घेऊन निपाणीकडे गेल्याची माहिती शिंगे याने दिली.त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास अर्जुननगर परिसरात माळी अपहृत मुलीसह मिळाला. पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले. दोन्ही संशयितांना अटक करून पुढील तपासासाठी त्यांचा ताबा राजारामपुरी पोलिसांकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, प्रदीप पाटील, संतोष बरगे, कृष्णात पिंगळे, परशुराम गुजर, प्रवीण पाटील, आदींच्या पथकाने कारवाई केली.अखेर सुटकेचा नि:श्वासगुंड माळी याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत, तर शिंगे याच्यावर दोन गुन्हे आहेत. दोघेही क्रूर मानसिकतेचे आहेत. अपहरण केल्यानंतर त्यांनी मुलीच्या आईला फोन करून तिचे तुकडे करून टाकण्याची धमकी दिली होती. दोनदा ही धमकी आल्याने पोलिसांनी तपास गतिमान करून संशयितांचा माग काढला. अखेर चिमुकली सुखरूप मिळाल्याने नातेवाइकांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलिसांच्या कुशीत चिमुरडी विसावलीअपहरणकर्ते मंगळवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत मुलीला दुचाकीवरून फिरवत होते. बराचवेळ वाऱ्यात फिरल्याने ती थकली होती. माळी याच्या तावडीतून सुटका होताच ती अंमलदार वैभव पाटील यांच्या कुशीत विसावली. पोलिसांनी तिला खायला देऊन गाडीत झोपवले. त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास नातेवाइकांच्या ताब्यात दिले.