दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तांवर कोल्हापुरात एक हजारांवर कोटींची उलाढाल; सवलती, ऑफर्समुळे ग्राहक झाले आकर्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:19 IST2025-10-25T17:19:30+5:302025-10-25T17:19:48+5:30
वाहनांच्या मार्केटमध्ये गर्दी

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तांवर कोल्हापुरात एक हजारांवर कोटींची उलाढाल; सवलती, ऑफर्समुळे ग्राहक झाले आकर्षित
कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दीपावली पाडव्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली. सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि रिअल इस्टेटसारख्या मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. अनेक दुकानांनी आकर्षक सवलती आणि ऑफर्स दिल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. अनेक ठिकाणी शून्य टक्के व्याजदर आणि ई-कॉमर्सवर विशेष सूट देऊन ग्राहकांना आकर्षित केले. पाडव्यानिमित्त खरेदीला कोट्यवधींच्या उलाढालीचे तेज आले.
दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत बुधवार हा बाजारपेठेत खरेदीची पर्वणी देणारा ठरला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह सोने, इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू, गॅझेट्स आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलेल्या या शुभदिवशी गॅस शेगडीपासून ते आलिशान वाहनांपर्यंतची खरेदी झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीची पर्वणी सुरू होती. शहरातील डिलर्सकडूनही ग्राहकांसाठी खास आकषक सवलतींसह विविध एक्स्चेंज ऑफर्स दिल्याने खरेदीला उधाण आले. पाडव्यानिमित्त खरेदीला कोट्यवधींच्या उलाढालीचे तेज आले.
सोने खरेदीने गुजरी लखलखली
पाडव्यादिवशी गुंजभर सोन्यापासून ते वजनदार दागिन्यांच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शहरातील गुजरीसह सराफ बाजारपेठ फुलून गेली. लग्नाच्या दागिन्यांच्या खरेदीलाही अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तालाच पसंती दिल्यामुळे गुजरी सोने खरेदीने लखलखली. चांदीच्या वस्तूंचीही खरेदी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात झाली.
वाहनांच्या मार्केटमध्ये गर्दी
बाइक, मोपेड आणि स्पोर्टस् बाइकच्या खरेदीला जास्त मागणी राहिली. तरुणाईची मागणी बुलेट आणि स्पोर्टस बाइकला असून, दीडशे सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक खरेदी करण्याकडेही तरुणाईचाच कल राहिला. वाहनाची डिलिव्हरी घेण्यासाठी सकाळपासूनच शोरूम्सचा आवार गजबजून गेला एक्स्चेंज ऑफरसह कमीत कमी डाऊन पेमेंट या सुविधेला ग्राहकांकडून अधिकाधिक प्रतिसाद मिळाला.
आकर्षक ‘ऑफर्स’ची बरसात
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बहुतांश व्यावसायिकांनी खास सवलत दिली. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, कॉस्मेटिक्स आणि इतर अनेक वस्तूंवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळाली. अनेक व्यावसायिकांनी ‘बाय वन, गेट वन’सारख्या सवलतीही दिल्या. दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सूट दिली.
इलेक्ट्रॉनिक्स मार्केट गजबजले
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या गिफ्ट खरेदीसाठी शहरातील स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट गर्दीने गजबजले. आय फोन्ससह स्मार्ट फोनची नवी रेंजही बाजारपेठेत आली. ऑनलाइन मार्केटच्या स्पर्धेला इलेक्ट्रॉनिक डिलर्सनी जोरदार टक्कर दिली.
साडेतीन मुहूर्तांवर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली. सणानिमित्त भावही कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांनी घेतला. - देवीचंद ओसवाल, महेंद्र ज्वेलर्स
जीएसटी कमी झाल्याने आणि अनेक ऑफर्सचा वर्षाव ग्राहकांवर करण्यात आला. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. - गिरीश शाह, गिरीश सेल्स
प्रत्येकाला आपल्या हक्काचे घराचे स्वप्न असते. सणाचा मुहूर्त साधून अनेकांनी ही पर्वणी साधली. बांधकाम व्यवसायाला चांगला बूस्ट मिळाला. - करण पाटील, श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स