विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त: बदलीची राज्यभर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:18 IST2019-02-23T18:14:55+5:302019-02-23T18:18:22+5:30
कोल्हापूर येथील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा शुक्रवारी राज्यभर होती. याप्रकरणी गृह विभागाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाला नसल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त: बदलीची राज्यभर चर्चा
कोल्हापूर : येथील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा शुक्रवारी राज्यभर होती. याप्रकरणी गृह विभागाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाला नसल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद येथून बदली झाल्यानंतर १२ जुलै २०१६ मध्ये नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ‘पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था’ चांगल्या प्रकारे हाताळली.
परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस ठाण्यांत नेहमी दाखल होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्रपणे पोलीस मुख्यालयासह ‘तक्रार निवारण कक्ष’, स्थापन करून १४६ पोलीस ठाण्यांत दर शनिवारी तक्रार निवारण दिन सुरू केला.
परिक्षेत्रामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी २०० पेक्षा जास्त गुन्हेगारी टोळ्यांना मोका लावला. गुन्हेगार-आदान-प्रदान कार्यक्रम, गुन्हे दोष सिद्धेचे प्रमाण वाढविणे, वाहतूक समस्या दूर करणे, प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या बदलीने नाशिककरांना एक सक्षम आणि चांगला अधिकारी मिळाला आहे. नांगरे-पाटील यांचे गाव बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांची बदली निश्चित होती. ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त दिले होते.
मुत्याळ यांच्या नावाची चर्चा
कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांची अप्पर पोलीस महासंचालकपदी बढतीवर मुंबईला बदली झाली. त्यानंतर दोन महिने येथील कार्यभार नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी सांभाळला होता. त्यांनी यापूर्वी सातारा पोलीस अधीक्षकपदी काम केल्याने परिक्षेत्रातील सामाजिक, राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्राचा अभ्यास त्यांना आहे.