Kolhapur: पुराच्या पाण्यात मध्यरात्री ट्रक उलटला; चालक, क्लिनर ट्रकवर जावून बसले, चार तासानंतर सुखरूप बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:36 IST2025-08-21T16:35:45+5:302025-08-21T16:36:59+5:30
बस्तवडे-आणूर दरम्यान १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पुलही पाण्याखाली गेला

Kolhapur: पुराच्या पाण्यात मध्यरात्री ट्रक उलटला; चालक, क्लिनर ट्रकवर जावून बसले, चार तासानंतर सुखरूप बाहेर काढले
म्हाकवे : बॅरिकेट बाजूला करुन पुराच्या पाण्यातून जाताना ट्रक उलटल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालक व क्लिनर दोघेही ट्रकवर जावून बसले. चार तासानंतर आपत्ती व्यवस्थापन, मुरगूड पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. बस्तवडे-आणूर दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली.
मुसळधार पावसामुळे पाटगाव चिकोञा धरणातून विसर्ग सुरु असल्याने वेदगंगा नदीने रुद्ररुप धारण केले आहे. बस्तवडे-आणूर दरम्यान चार वर्षांपूर्वी सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पुलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने आणुर व बस्तवडेकडील बाजूला बॅरिकेट लावून हा मार्ग पुर्णतः बंद केला आहे.
तरीही आज बुधवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाने बॅरिकेट बाजूला करून पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वळणदार मार्गावर रस्त्याचा अंदाज न आल्याने हा ट्रक रस्त्याच्या पुर्व बाजूला उलटला. प्रसंगावधान राखत चालक व क्लिनर ट्रकवर जावून बसले. चार तासांनंतर आपत्ती व्यवस्थापन, मुरगूड पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, काल मंगळवारी मध्यरात्रीही बानगे येथे एका ट्रक चालकाने बॅरिकेट बाजूला करून पुराच्या पाण्यात ट्रक नेला होता. त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
अडाणीपणा की नसते धाडस?
प्रशासनाने आवाहन केले तरीही अनेक ठिकाणी वाहन चालक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाहने घेऊन जातात. दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून रस्ता का बंद केला असावा याचीही दक्षता न घेण्याइतपत हे चालक अडाणी आहेत का?अशी चर्चाही घटनास्थळी सुरू होती.