गोकुळ शिरगावातील स्मशानभूमीचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST2021-04-02T04:24:01+5:302021-04-02T04:24:01+5:30
विजय कदम कणेरी : ‘चांगली व्यक्ती, चांगले दिवस, चांगली वस्तू वेळ निघून गेल्यावर कळते. मरावे परी कीर्तीरूपे उरावे. ...

गोकुळ शिरगावातील स्मशानभूमीचा कायापालट
विजय कदम
कणेरी : ‘चांगली व्यक्ती, चांगले दिवस, चांगली वस्तू वेळ निघून गेल्यावर कळते. मरावे परी कीर्तीरूपे उरावे. जीवन असे जगा, की मृत्यूनंतरही तुमची आठवण कायमस्वरूपी राहील’, हे शुभविचार आहेत गोकुळ शिरगावच्या मुक्तिधाम (वैकुंठधाम)मधील. गोकुळ शिरगावमध्ये ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकसहभागातून सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारली आहे. सरपंच महादेव पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. गावातील कोणत्याही मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार मोफत व्हावेत, यासाठी गावाच्या स्मशानभूमीत शेणी व जळाऊ लाकूड अंत्यविधीसाठी मोफत ठेवण्यात आले आहे. सरपण ठेवण्यासाठी व लोकांना बसण्यासाठी शेड उभारले आहे. येथील भिंतींवरही अनेक शुभसंदेश लिहून, त्या भिंतींना बोलके बनवले आहे. स्मशानभूमीची स्वागत कमानही आकर्षक बनविल्याने या स्मशानभूमीचे रूपडे पुरते पालटून गेले आहे. पेव्हिंग ब्लॉक, नातेवाईकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी ठेवून, सावलीसाठी शोभेची फुलझाडे लावली आहेत.
चौकट :
येथे प्रत्येक मृतावर अंत्यसंस्कार मोफत केले जात आहेत.
तिरडीपासून शेणी, कापड, जळाऊ लाकूड अगदी मोफत दिले जात आहे. विशेष म्हणजे गोकुळ शिरगावात स्मशानभूमीचे गेल्या ७० वर्षांत काम झाले नव्हते. मात्र, सरपंच पाटील यांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निश्चय केला. त्यांच्या संकल्पनेला ग्रामस्थांनीही बळ दिल्याने हे काम तडीस गेले आहे.
फोटो : ०१ गोकुळ शिरगाव स्मशानभूमी
ओळ:
गोकुळ शिरगावात उभारलेली सुसज्ज स्मशानभूमी.