आपत्तीच्यावेळी मुलीही वाचवणार लोकांचा जीव-कोल्हापुरात प्रशिक्षण सुरू: प्रात्यक्षिकांसह माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:56 IST2019-03-12T00:54:47+5:302019-03-12T00:56:00+5:30
भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानाजवळ असलेल्या होमगार्ड कार्यालय परिसरात मुलींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात होते.
कोल्हापूर : भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत असून, त्यांचे १५ दिवसाचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू झाले.
केंद्र सरकारच्या आपदा प्रशिक्षण उपक्रमासाठी देशातील विविध राज्यांमधील शहरांची निवड केली आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करणे व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कोल्हापूरमधून २०० जणांची रेस्क्यू टीम तयार करण्यात येत आहे. यापूर्वी नागपूरमधून ३५ व कोल्हापुरातून ३० अशी ६५ मुलांची टीम तयार केली आहे.
आपत्ती म्हटली की मुलांची टीम लोकांना वाचविण्यासाठी जात असते. महिला हे काम करू शकणार नाहीत, असा एक समज असतो; पण आता मुलीही या संकटांशी सामना करण्यासाठी तयार होत आहेत. त्यासाठी कोल्हापुरातील विविध भागांतून ५० मुलींची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मुलींची टीम तयार करणारा कोल्हापूर हा देशातील पहिला जिल्हा आहे. या मुलींना गृहरक्षक दल कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण देण्यात येत आहे.
हे प्रशिक्षण १५ दिवस चालणार असून, यात पूर, भूकंप, आग, त्सुनामी, इमारतींची पडझड, दरडी कोसळणे, वायू गळती, अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी लोकांचा जीव कसा वाचविला पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येत आहे. संरक्षण विभागाच्या उपनियंत्रक सोनल मेहरोळे, सहायक उपनियंत्रक बाबासाहेब मंगसुळे, सुधाकर सूर्यवंशी, अतुल जगताप हे अधिकारी मुलींना प्रशिक्षण देत आहेत.
परीक्षाही होणार
हे प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर, आजरा, चंदगड, इचलकरंजी, गारगोटी, भुदरगड, टाकवडे येथून मुली आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मुलींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाणार आहे.