Kolhapur: पीटीएमला केएसए लीगचे विजेतेपद, शिवाजी तरुण मंडळ उपविजेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 19:28 IST2025-02-17T19:27:55+5:302025-02-17T19:28:13+5:30
कोल्हापूर : सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून अत्यंत चुरशीने आणि मिळेल त्या संधीचा फायदा घेत गोल करण्यासाठी मैदानात उतरलेल्या खेळाडूंनी श्वास ...

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून अत्यंत चुरशीने आणि मिळेल त्या संधीचा फायदा घेत गोल करण्यासाठी मैदानात उतरलेल्या खेळाडूंनी श्वास रोखून धरण्यासारखा खेळ केला. प्रत्येक मिनिटाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढली. केवळ एकमेव गोलच्या आधारे पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने श्री शिवाजी तरुण मंडळावर १-० अशा गोलफरकाने मात करून श्री शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल लीग ए डिव्हिजनमधील स्पर्धेचा विजेता ठरला. श्री शिवाजी तरुण मंडळ उपविजेते ठरले. खंडोबा तालीम मंडळाने तिसरा आणि बालगोपाल तालीम मंडळाने चौथा क्रमांक पटकाविला.
केएसए लीगमधील अंतिम सामना शाहू स्टेडियमवर पार पडला. अटीतटीच्या सामन्यासाठी सुमारे वीस हजारांहून अधिक प्रेक्षकांनी सामन्यासाठी हजेरी लावली. अंतिम सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ अ संघात झाला. श्री शिवाजी तरुण मंडळ संघावर १ - ० असा विजय मिळवत पाटाकडील तालीम मंडळ संघाने लीग स्पर्धेमध्ये १५ गुणांची कमाई केली. या गुणांच्या जोरावर पीटीएमने केएसए फुटबॉल चषकावर नाव कोरले. सामन्यातील एकमेव गोल ऋषिकेश मेथे पाटील याने नोंदविला.
पूर्वाधात ‘पाटाकडील’च्या ऋषिकेश मेथे - पाटील याने कॉर्नर किकवर मारलेला फटका ‘श्री शिवाजी’चा गोलकीपर मयुरेश चौगुले याने तटविला. ‘श्री शिवाजी’च्या संकेत साळोखे, इंद्रजीत चौगुले, करण चव्हाण - बंदरे यांनी गोलसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पूर्वाधात गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात ‘पाटाकडील’च्या ओंकार मोरे याच्या पासवर प्रथमेश हेरेकर याने मारलेला सुरेख फटका गोल पोस्टच्या जवळून गेला. ‘श्री शिवाजी’च्या करण चव्हाण बंदरे याची संधी वाया गेली.
सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला प्रतीक बदामे याच्या पासवर ऋषिकेश मेथे - पाटील याने हेडद्वारे सुरेख गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फेडण्यासाठी ‘श्री शिवाजी’ संघाकडून जोरदार चढाया झाल्या, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्यात १ - ० या गोल संख्येच्या ‘पाटाकडील’ने सामन्यात विजय संपादन केला.
सामना जिंकल्याने ‘पीटीएम’चे १२ वरून १५ गुण झाल्याने संघ या लीग स्पर्धेत विजेता ठरला. श्री शिवाजी तरुण मंडळ १४ गुणांसह दुसऱ्या तर खंडोबा तालीम मंडळ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिले. बालगोपाल तालीम मंडळ संघाला १२ गुणांसह चतुर्थस्थानी समाधान मानावे लागले.