आजरा-आंबोली मार्गावर पर्यटकांना टस्करचे दर्शन, वेळवट्टीत मोठ्याने चित्कारल्याने भितीयुक्त वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:50 IST2022-03-07T16:16:53+5:302022-03-07T16:50:43+5:30
दिवसभर जंगलात राहणारा टस्कर सायंकाळी पाणी व चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पिके फस्त करत आहे

आजरा-आंबोली मार्गावर पर्यटकांना टस्करचे दर्शन, वेळवट्टीत मोठ्याने चित्कारल्याने भितीयुक्त वातावरण
आजरा : आजरा - आंबोली मार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही टस्कर २५ ते ३० मिनीटे रस्त्यावर होता. गोवा व कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना त्याचे जवळून दर्शन झाले. रस्ता ओलांडून वेळवट्टी ( ता. आजरा ) येथील हाॅटेलचा माळ या शिवारात जावून मोठ्याने चित्कारल्याने भितीयुक्त वातावरण पसरले आहे. दिवसभर जंगलात राहणारा टस्कर सायंकाळी पाणी व चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पिके फस्त करत आहे.
कर्नाटकातील टस्कर २००७ पासून आजरा तालुक्यात ठाण मांडून आहे. दररोज पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. वनविभागाकडून पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. भरपाईपेक्षा पिकांसाठी करावी लागणारी मशागत, बियाणे, खते यांचा खर्च जास्त आहे. त्यामुळे आजऱ्यातील शेतकरी कर्जबाजारी होत आहे. टस्कर हत्तीच्या भितीमुळे मसोली, हाळोली, वेळवट्टी, सुळेरान, घाटकरवाडी या परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे.
टस्कर दिवसभर चाळोबाच्या जंगलात थांबून सायंकाळच्यावेळी आजरा - आंबोली रस्ता ओलांडून वेळवट्टी तिट्ट्याजवळील प्रकाश शिंदे यांचे शेतात दररोज येत आहे. सलग दोन दिवस या हत्तीने कोकणसह गोव्यात पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरच दर्शन दिले. दोन दिवस टस्कर सायंकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्यावर आला. यावेळी सर्व वाहने थांबल्याने तो काही वेळाने पुन्हा शिवारात गेला. यावेळी पर्यटकांना टस्करचे दर्शन झाले.
आजरा-आंबोली मार्गावर पर्यटकांना टस्करचे दर्शन, वेळवट्टीत मोठ्याने चित्कारल्याने भीतीयुक्त वातावरण #Kolhapurpic.twitter.com/P9eThvY9Hb
— Lokmat (@lokmat) March 7, 2022