Kolhapur: बागेत खेळताना घसरगुंडीत अडकून चिमुकलीची करंगळी तुटली, जबाबदार कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:01 IST2025-03-19T12:01:35+5:302025-03-19T12:01:49+5:30
कोल्हापूर : बागेत खेळताना फाटलेल्या घसरगुंडीमध्ये करंगळी अडकल्याने ती तुटल्याची घटना गेल्या शुक्रवारी (दि. १४) ताराबाई पार्कातील आकार बागेत ...

Kolhapur: बागेत खेळताना घसरगुंडीत अडकून चिमुकलीची करंगळी तुटली, जबाबदार कोण ?
कोल्हापूर : बागेत खेळताना फाटलेल्या घसरगुंडीमध्ये करंगळी अडकल्याने ती तुटल्याची घटना गेल्या शुक्रवारी (दि. १४) ताराबाई पार्कातील आकार बागेत सायंकाळी घडली. अक्षरा अमोल सोनवणे (वय-३) असे या मुलीचे नाव आहे.
सोनवणे कुटुंब मूळचे ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) आहे. ते गेली काही वर्षे माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या बंगल्यात वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची मुलगी शेजारीच असलेल्या बागेत खेळायला गेली असता पत्र्याची घसरगुंडी फाटलेली होती. घसरगुंडीवरून वेगात खाली येताना नेमकी तिच्या डाव्या पायाची करंगळी त्यात जोरात अडकली व ती तुटली. रक्तबंबाळ स्थितीत तिला पालकांनी सीपीआर रुग्णालयात तातडीने नेले; परंतु तिथे गेल्यानंतर करंगळी तुटल्याचे लक्षात आले.
तेव्हा करंगळी घसरगुंडीतच अडकली होती. तिला माती लागली होती व काही वेळ गेल्याने डॉक्टरांनी आता ती जोडता येणार नाही. त्यातून काही जंतुसंसर्ग होईल, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे करंगळी न जोडताच छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारीच तिच्या पायाचे बँडेज काढले आहे. त्यामुळे उमलत्या वयातच तिला करंगळी गमवावी लागली.
आता तिला विनाकरंगळीचे आयुष्य काढावे लागणार आहे. करंगळी तुटली असल्याने तिला अपंगत्वाचा दाखला मिळणार नाही. पोलिस भरती किंवा तत्सम सेवेत जाताना अडचणी येतील शिवाय लग्नाच्या वेळीही त्रास होईल, अशी भीती तिच्या आईवडिलांना वाटत आहे. त्यामुळे या अपघाताची नुकसानभरपाई मिळावी असे कुटुंबीयांना वाटते. परंतु त्यासाठी नेमकी दाद कुणाकडे मागावी असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.
जबाबदार कोण?
ही बाग स्थानिक सोसायटीने विकसित केली आहे. घसरगुंडी खराब झाल्याचे त्यांना यापूर्वीच कळवले होते; परंतु त्याकडे कुणी लक्ष दिले नसल्याचे सांगण्यात येते. आमचा या बागेशी संबंध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मालकीच्या उद्यानातील खेळण्यांची स्थिती यापेक्षा फार चांगली आहे असे नाही.