‘गोकुळ’च्या इच्छुकांची आज पहिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:44+5:302021-04-05T04:20:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गाेकुळ) निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ४८२ अर्ज दाखल ...

‘गोकुळ’च्या इच्छुकांची आज पहिली परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गाेकुळ) निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ४८२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची आज, साेमवारी छाननी हाेणार आहे. मतदानापूर्वीची ही पहिली परीक्षा असल्याने सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पशुखाद्यासह इतर अटींचा अनेकांना दणका बसणार आहे.
‘गोकुळ’साठी २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. तीन दिवसांच्या सुटया वगळता पाच दिवसात २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले. दोन्ही पॅनेल तगडे होणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. अनेकांना ‘गोकुळ’च्या संचालक पदाचे धुमारे फुटू लागल्याने ही संख्या वाढली आहे. त्यात मागील निवडणुकीपेक्षा संचालक मंडळात तीन जागा वाढल्याचा परिणामही झाला. सर्वसाधारण गटातील १६ जागांसाठी २७५, महिला गटातील दोन जागांसाठी ९७, तर इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जाती प्रत्येकी एका जागेसाठी अनुक्रमे ६८, २० व १९ अर्ज दाखल झाले आहेत.
संघाच्या पोटनियमानुसार संचालक पदाच्या पात्रतेचे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेने ‘गोकुळ’कडून सलग तीन वर्षे वर्षाला दहा टन पशुखाद्याची खरेदी करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर वर्षाला ४० हजार लिटर दुधाचा पुरवठा करणे गरजेचे आहे. या दोन अटींमध्येच अनेकजण अडकणार आहेत.
छाननी ही मतदानापूर्वीची परीक्षा असल्याने सगळ्या इच्छुकांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. करवीर प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी अकरापासून अर्जांच्या छाननीस सुरुवात होणार आहे.