शेतकऱ्यांवर वाळलेल्या उसाचे ओझे वाहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:18+5:302021-09-17T04:30:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने नदीकाठच्या ऊसशेतीचे वाळवण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तांबट रंगात माखलेला ऊस आता मात्र ...

शेतकऱ्यांवर वाळलेल्या उसाचे ओझे वाहण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : महापुराने नदीकाठच्या ऊसशेतीचे वाळवण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तांबट रंगात माखलेला ऊस आता मात्र काळपट होऊन वाळला आहे. ऊस कुजल्याने कुबट वासाचे साम्राज्य पसरले आहे. उत्पादन नसेना वैरण तरी हाताला लागेल तेही नाही झाले तर कांड्या वाळवून जळण म्हणून वापरता येईल यासाठी उसकापणीची धांदल शिवारात पाहवयास मिळते. उसासारख्या नगदी पिकाच्या नुकसानीचे ओझं वाहण्याची वेळ महापुराने शेतकऱ्यांवर आणली आहे.
उसाच्या लागणी,खोडवी माना मुरगुळून पडल्या आहेत. अनेक ठिकाणी उंचापुरा जोमदार आलेला ऊस भुईसपाट होऊन शुद्ध हरपल्याच्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. आठ-दहा महिने राबराब राबून मशागत, खते देऊन दमदार आणलेला हिरवागार ऊस महिन्यात काळवंडलेला अन् निर्जीव झालेला ऊस पाहताना शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरू लागले आहेत. सोयाबीन,भुईमूग, कडधान्ये अस्तित्वहीन झाली. त्यामुळे वारणा नदीकाठचा परिसर व्यापक नुकसानीत गुरफटला आहे. यातून बळीराजा कसे कसे पुन्हा सावरून उभे राहायचे या विवंचनेत सापडला आहे.
पूर ओसल्यानंतर काही दिवसांत शेतकरी आपल्या पिकांची अवस्था पाहण्यासाठी धाडसाने शिवारात जाऊ लागले. पिकांची स्थिती किती विदारक असेल या चिंतेने जाण्याचे धाडस करीत नव्हते. पण पंचनामाच्या निमित्ताने कृषी विभागातील अधिकाऱ्यांबरोबर शेतात जाणे भाग पडले. त्यांना नुकसानीची चित्रमय स्थिती हादरवणारी वाटली. अद्यापही नदीकाठी शेतात पोहचणे मुश्कील झाले आहे.
उसाच्या सुरळीत पाणी ,गाळ गेल्याने कुजण्याची प्रक्रिया झपाट्याने झाली आहे. बगल फुटवा कुठे तरी फुटू लागला आहे. पण त्याचा उसाच्या पकवतेसाठी उपयोग नाही. काही भागातील ऊस दशी फुटून पोकळ होऊ लागला आहे. अशक्त उसाचे प्रमाणही वाढत चालले आहे.
शेतकरी मात्र जे काही हाताला लागेल तसे शेताच्या बाहेर काढू लागले आहेत. विशेष म्हणजे जो ऊस जनावरांना खाण्यायोग्य नाही तो वाळत घालून जळण म्हणून उपयोग होईल, अशी आशा बाळगू लागला आहे. जो काही ऊस थोडा फार तरला आहे. तो कारखान्याला लवकर जावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागला आहे.