तीन टोल नाके उभारण्याचा घाट
By Admin | Updated: September 2, 2015 23:27 IST2015-09-02T21:25:24+5:302015-09-02T23:27:34+5:30
सांगली-कोल्हापूर रस्ता : एकाच ठिकाणी टोल बसविण्याची आंदोलन अंकुशची मागणी

तीन टोल नाके उभारण्याचा घाट
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्याचे ५० टक्केही काम झाले नसताना सुप्रीम कंपनीकडून टोल उभारण्याची गडबड सुरू झाली आहे. तसेच एकाच ठिकाणी टोल बुथ उभा करण्याचा करार केला असला, तरी तीन ठिकाणी टोल उभारण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय कंपनीला पूर्णत्वाचा दाखला दऊ नये. तसेच टोल वसुलीचा कालावधी कमी करण्यात यावा व करारानुसारच टोल बसविण्यात यावा, अशी मागणी आंदोलन अंकुश संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर २०१० मध्ये सुप्रीम कंपनीला देण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनी या कंपनीने काम सुरू केले. रस्त्याचे काम पाच विभागांत सुरू असून, शिरोली ते बसवान खिंड चौपदरीकरण, अंकली ते सांगली चौकपदरीकरण, बसवान खिंड ते जैनापूरमार्गे अंकली दुपदरी व बसवानखिंड ते जयसिंंगपूरमार्गे अंकली दुपदरी, असे काम सुरू आहे. मात्र, आजअखेर ५० टक्केही काम झालेले नाही.
मार्गावर २०० मी, ५०० मी, रस्त्याची लांबी दर्शविणारे किलोमीटर स्टोन बसविण्यात आले नाहीत. महामार्ग चौपदरीकरणात अडीच हजार झाडांची कत्तल झाली असताना सुप्रीम कंपनी मात्र महामार्गावर वृक्षारोपण करणार नसल्याचे समजते.
अंदाज पत्रकातील सर्व परिच्छेदांत सर्व काम पूर्ण केल्यानंतर मक्तेदाराने कामात गुंतविलेल्या रकमेचा परतावा म्हणून टोलरूपाने ३० वर्षे वसूल करण्याचा करार आहे. मात्र, २०१० सालच्या रस्त्यावरील पीसीओ वरून ३० वर्षांचा करार करण्यात आलेला असून, टोल वसुलीची मुदत कमी करावी लागणार आहे, अन्यथा सामान्य नागरिकांच्या माथ्यावर हे टोलचे भूत बसणार आहे. कंपनीला टोल वसुलीसाठी करारानुसार बसवानखिंड येथे एकाच ठिकाणी टोल वसुली करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच वसुली केली जावी. तसेच शंभर टक्के काम पूर्ण झाल्याखेरीज कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंदोलन अंकुशच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वसुलीची मुदत कमी करा
गेल्या पाच वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम अगदी रेंगाळत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. २०१०ला चौपदरीकरणाची निविदा काढण्यात आली. व दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, २०१२ ला रस्त्याचे काम सुरू झाले ते अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे २०१० च्या पीसीओ प्रमाणे ३० वर्षे टोलवसुलीची मुदत दिली होती. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने पाच वर्षांत रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टोल वसुलीची मुदत कमी करण्याची गरज आहे.
तीन टोलनाक्यांचा घाट
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सांगली-कोल्हापूर रस्ता चौपदरीकरणाच्या करारात एकाच ठिकाणी टोल बसविण्याची अट आहे. मात्र, सुप्रीम कंपनीकडून तीन ठिकाणी टोल बसविण्याचा घाट घातला आहे. तसेच काम अपूर्ण असताना टोल उभारल्यास जनआंदोलन उभारून त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.