Three-thirteen of the history of the production of instant historical films | झटपट ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीने इतिहासाचे तीन-तेरा

कोल्हापुरातील उभा मारुती चौक, शिवाजी पेठ येथे शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘पानिपत’कार लेखक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष कोराणे, अशोक साळोखे, सुजित चव्हाण, व्ही. बी. पाटील, अनिल देशपांडे, महेश जाधव, सुरेश साळोखे, चंद्रकांत साळोखे, आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे विश्वास पाटील यांचे प्रतिपादन : शिवाजी तरुण मंडळातर्फे आयोजित व्याख्यान

कोल्हापूर : जादा पैशांच्या मोहात कमी वेळेत झटपट ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करून इतिहासाचे तीन-तेरा वाजविण्याचे काम होत आहे. त्यामुळे मूळ इतिहास समोर येत नाही. त्यासाठी अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुरेसा वेळ व इतिहासाचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ‘पानिपत’कार लेखक विश्वास पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठ्यांनी तब्बल २५ वर्षे दिल्लीवर भगवे निशाण फडकाविले होते, असेही त्यांनी सांगितले.

उभा मारुती चौक, शिवाजी पेठ येथे शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘पानिपतच्या लढ्याची रोमांचकारी शौर्यगाथा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक व्ही. बी. पाटील होते. प्रमुख उपस्थिती मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव महेश जाधव, प्राचार्य व्ही. एम. पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, चंद्रकांत साळोेखे, अशोकराव साळोखे, अजित नरके, रवींद्र साळोखे, रोहित मोरे, सुरेश जरग, अनिल देशपांडे, आदींची होती.

विश्वास पाटील म्हणाले, पानिपतची लढाई समजून घेताना राष्टÑाचा नकाशासमोर आणावा लागेल; कारण त्यावेळी मराठ्यांचा दबदबा सिंधूपासून रामेश्वर व बंगालपर्यंत होता.
पानिपतची लढाई ही मुस्लिमविरोधी नव्हती; तसेच ती ब्राह्मणांचीही नव्हती; कारण त्यावेळी मराठा साम्राज्यात

सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु तत्कालीन संदर्भ आणि वस्तुस्थिती पाहता त्यांमध्ये फारसे तथ्य दिसत नाही.


 

Web Title:  Three-thirteen of the history of the production of instant historical films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.