तीन कोटी आज ताब्यात देणार

By Admin | Updated: March 22, 2016 00:52 IST2016-03-22T00:41:57+5:302016-03-22T00:52:18+5:30

वारणा शिक्षक कॉलनी चोरीप्रकरण : आरोपीच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ; जी. डी. पाटील यांची चौकशी होणार

Three million will be handed over today | तीन कोटी आज ताब्यात देणार

तीन कोटी आज ताब्यात देणार

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने चोरी केलेले तीन कोटी रुपये सांगली पोलिस आज, मंगळवारी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधून रक्कम कोणत्या खात्यावर जमा करायची त्याची माहिती घेतली.
दरम्यान, मैनुद्दीनची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा पन्हाळा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली. या गुन्हाप्रकरणी शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांना चौकशीसाठी बोलाविणार असल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम सांगली पोलिसांना मिळून आली होती. त्यानंतर वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. ही तीन कोटींची रक्कम सांगली पोलिसांच्या ताब्यात होती. चोरीच्या गुन्ह्यातील ही रक्कम निष्पन्न झाल्याने ती प्राप्तिकर खात्याकडे जमा केली नाही. दरम्यान, कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टी डेव्हलपर्सचे मालक झुंजार सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत पैसे चोरीला गेल्याची फिर्याद दिली. त्यानंतर कोडोली पोलिसांनी कॉलनीमधील रूमची झडती घेतली असता आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळून आले. सुमारे सव्वाचार कोटींची बेहिशेबी रक्कम मिळाल्याने हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आला. पोलिस निरीक्षक मोहिते यांनी सांगली पोलिसांना गुन्ह्यातील तीन कोटींची रक्कम कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्यावी, असा पत्रव्यवहार केला. त्यानुसार सांगली पोलिस सोमवारी ही रक्कम कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देणार होते. रक्कम आपल्या ताब्यात येणार म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोषागार कार्यालयाशी पत्रव्यवहार करून ती रक्कम कोणत्या खात्यावर जमा करायची याची दिवसभरात माहिती घेतली, परंतु रात्री उशिरापर्यंत रक्कम सांगली पोलिस घेऊन आले नाहीत. ते आज रक्कम कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देतील, असे निरीक्षक मोहिते यांनी सांगितले. त्यानंतर पैसे भरलेला खातेनंबर व रकमेची पावती न्यायालयात सादर केली जाणार आहे. तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल. नंतर अंतिम निकालावेळी ही रक्कम फिर्यादींना परत करायची की शासनदरबारी जमा करायची याचा निर्णय न्यायालय घेईल, असेही मोहिते यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

प्राप्तिकर खात्याचा स्वतंत्र तपास
वारणा शिक्षक कॉलनीमधून चोरी झालेले तीन कोटी व त्यानंतर त्याच ठिकाणी सापडलेले एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये अशा सुमारे सव्वाचार कोटींच्या बेहिशेबी रकमेचा स्वतंत्रपणे प्राप्तिकर खाते गोपनीय तपास करीत आहे. या रकमेतील तीन कोटी हे चोरीचे असल्याने ते सांगली पोलिसांच्या ताब्यात आहेत. उर्वरित रक्कम ही प्राप्तिकर खात्याच्या ताब्यात आहे. या संपूर्ण रकमेचा हिशेब फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्याकडून प्राप्तिकर खात्याचे अधिकारी घेत आहेत.

मुल्लाच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ
पन्हाळा : या प्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याला सोमवारी आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायमूर्ती भूषण ठाकूर यांनी वाढवून दिली आहे. आरोपी मुल्ला याला बुलेट गाड्या खरेदी करण्यासाठी वापरलेले तीन लाख रुपये जप्त करणे, तसेच साथीदार रेहान अन्सारी याचा शोध घेण्यासाठी आणखी दहा दिवसांची पोलिस कोठडी घ्यावी, अशी विनंती सरकारी वकील अमोल कांबळे व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तपासी अधिकारी विकास जाधव यांनी न्यायालयास केली. तथापि, आरोपीचे वकील प्रमोद सुतार यांनी त्यास जोरदार हरकत घेतल्याने पोलिस कोठडीत केवळ तीन दिवसांची वाढ करण्यात आली. दरम्यान, आरोपी मुल्ला यास एकच किडनी असल्याने त्याचा बहुतेक वेळ रुग्णालयात जात असल्याने तपासांत प्रगती होत नसल्याचे तपासी अधिकारी विकास जाधव यांनी स्पष्ट केले. आरोपी मुल्ला याला पाहण्यासाठी पन्हाळा न्यायालयात मोठी गर्दी होती. आरोपीला भेटण्यासाठी त्याचा भाऊ व पत्नी कोर्टात सकाळपासूनच हजर होते.


मैनुद्दीनच्या कबुलीनंतरही मिरजेतील पोलिस गप्प!
आमिषाला बळी :‘पार्टी’मुळे बातमी फुटली
सांगली : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून तीन कोटींच्या रकमेवर डल्ला मारल्याची कबुली अटकेत असलेल्या मैनुद्दीन मुल्लाने मिरजेतील काही पोलिसांसमोर दिली होती. परंतु, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तडजोडीवर भर दिला. यातूनच बुलेटसह फ्लॅट खरेदीचा सौदा ठरला असल्याची माहिती पुढे आली आहे.
मैनुद्दीनची पाठराखण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का? या प्रश्नावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मौन बाळगले आहे.
रक्कम किती चोरली आहे, याचा मैनुद्दीनला अंदाज नव्हता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यास पकडल्यानंतर ही रक्कम तीन कोटी सात लाख ६३ हजार ५०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले होते. ८ मार्चपासून तो ही रक्कम
घेऊन सांगली, मिरज परिसरात फिरत होता. त्याचवेळी त्याने मिरजेत ‘वसुली’ करण्यात माहीर असलेल्या काही पोलिसांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या पार्टीत वारणानगर येथून कोट्यवधी रुपयांचे घबाड चोरून आणल्याची त्याने कबुली दिली होती.
कोणी काय घ्यायचे, याविषयी पोलिसांनी मुल्लाशी चर्चा केली; मात्र पार्टीची बातमी फुटल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. ही रक्कम कुठे ठेवायची? असा प्रश्न पडला असल्याचे त्याने बोलून दाखविले, त्यावेळी या पोलिसांनी त्याला निर्जन ठिकाणी ही रक्कम पुरून ठेवण्याचा सल्ला दिला होता, अशी चर्चा सुरू आहे. अखेर त्याने धामणी (ता. मिरज) येथे ही रक्कम पुरून ठेवल्याचे कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीतूनही पुढे आले आहे.
एका पोलिसाला फ्लॅटसाठी मैनुद्दीनने पाच लाख रुपये दिल्याची जोरदार चर्चा आहे. त्याने हे पाच लाख रुपये दिल्याचे वृत्त खरे निघाले तर चोरी केलेल्या घबाडाच्या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते, त्यामुळे या गुन्ह्याच्या आवाका आणखीन वाढू शकेल. (प्रतिनिधी)


फ्लॅटसाठी बुकिंग
पार्टीत सहभागी झालेल्या एका पोलिसाने मुल्लाकडून फ्लॅट खरेदीसाठी पाच लाख घेऊन बुकिंगही केल्याची चर्चा आहे. परंतु, सांगली आणि कोल्हापूर पोलिसांच्या तपासात ही बाब कुठेही कागदावर आलेली नाही. बुलेट खरेदीचे प्रकरण कागदावर येऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

Web Title: Three million will be handed over today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.