'कोल्हापुरी'सह तीन प्रकल्पाला बूस्ट, मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:12 IST2025-08-08T16:11:46+5:302025-08-08T16:12:46+5:30
नवतेजस्विनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मंत्र्यांचे आश्वासन

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कोल्हापूर चपलेसह जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या प्रकल्पाला बूस्ट मिळणार आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पासाठी ३ टक्के निधीतून आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असा विश्वास दिला. यासंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करून लवकर निधी मिळेल यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृहातील दरबार हॉल येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत तटकरे यांनी महिला बचत गटाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. वाकरे येथील भेंडी मिरची प्रकल्प, बालिंगा आणि पाेर्ले येथील राइस मिल, शेळीपालन प्रकल्पाला तसेच सांगरुळ येथील कोल्हापुरी चप्पल या प्रकल्पाला वर्षभरात बळ देऊ, असे त्या म्हणाल्या.
अस्मिता लोकसंचालित साधन केंद्राचे अनुराग कोकितकर यांनी तटकरे यांना सांगरुळ येथील या १ कोटी २९ लाखांच्या प्रकल्पात १० गावातील १५० महिला सहभागी असल्याचे सांगितले. अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी त्याला आणखीन ८६ लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे तटकरे यांनी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांना सूचना केल्या. माविम पुणे विभागाचे व्यवसाय विकास सल्लागार सिद्धराम माशाळे उपस्थित होते.
सुभाषनगरात कारागिरांशी साधला संवाद
अदिती तटकरे यांनी दुपारी आपला ताफा थेट सुभाषनगरातील चप्पल कारागीरांकडे वळवला आणि हे चप्पल कारागीर नेमके कशा पद्धतीने हाताने नक्षीकाम करतात हे २० मिनिटे थांबून प्रत्यक्ष पाहिले.