तीनशे रुपयांची लाच : चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 20:13 IST2018-02-14T20:12:34+5:302018-02-14T20:13:52+5:30
पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दीपाली दशरथ खडके ( २८, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे.

तीनशे रुपयांची लाच : चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला अटक
कोल्हापूर - पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दीपाली दशरथ खडके (२८, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. बुधवारी दूपारी चंदगड पोलीस ठाण्यात ही कारवाई झालेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आज, गुरुवारी तिला गडहिंग्लज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अधिक माहिती अशी, तक्रारदारांना भविष्यात परदेशी जावयाचे असलेने त्यांनी पासपोर्ट मिळणे करीता आॅनलाईन अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तक्रारदार यांनी कोल्हापूर येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये केली होती. या कार्यालयाने त्यांची चारीत्र पडताळणी करण्यासाठी कागदपत्रके चंदगड पोलीस ठाण्यास पाठविली. येथील गोपनिय व पासपोर्ट विभागाचे कामकाज दीपाली खडके पाहत होती. तिने अर्जावरुन तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी बोलवून घेतले. पासपोर्टचे काम करुन देण्यासाठी तीनशे रुपयांची मागणी केली. त्यावर करुया असे म्हणून ते बाहेर पडले. त्यांनी थेट लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांची भेट घेवून खडेकच्या विरोधात तक्रार दिली.
पैसे गिळण्याचा प्रयत्न
पोलीस उपअधीक्षक गोडे यांनी तत्काळ कारवाई करण्याची तयारी केली. दोन सरकारी पंचासमक्ष तक्रारदारांना चंदगड पोलीस ठाण्यात पाठविले. यावेळी खडके हिने तीनशे रुपयांची मागणी केलेचे निष्पन्न झाले. बाहेर पोलीस उपअधीक्षक गोडे, निरीक्षक प्रविण पाटील व त्यांचे सहकारी सापळा रचुन बसले होते. तक्रारदाराने पंचासमक्ष खडकेला तीनशे रुपये दिले. आजूबाजूला उभे असलेले पथकातील काही कर्मचारी आतमध्ये येताच खडेकच्या लक्षात आले. तिने हातातील तीनशे रुपये तोंडात टाकून चावून गिळण्याचा प्रयत्न केला. पथकातील महिला कॉन्स्टेबलने तिला जागेवर धरुन तिच्या तोंडातुन नोटांचे तुकडे बाहेर काढले.
घराची झडती
चंदगड पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल लाच घेताना मिळून आलेच्या वृत्ताने पोलीस दलात खळबळ उडाली. कॉन्स्टेबल खडके हिच्या आत्याळ येथील घराची रात्री उशीरा पथकाने झडती घेतली. लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अहवाल प्राप्त होताच तिला खात्यातून निलंबित केले जाणार आहे.