coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण, वैद्यकीय सचिवांनी दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:29 IST2025-05-21T12:28:35+5:302025-05-21T12:29:58+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार ...

संग्रहित छाया
कोल्हापूर: जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर महापालिका हद्दीतील ८३ वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. १२ मे राेजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाबत दक्ष राहण्याच्या ‘सीपीआर’ला सूचना
कोरोनाबाबत दक्ष राहा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव धीरजकुमार यांनी दिल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.
सिंगापूर आणि हाँगकाँग येथे सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असून देशभरात १९ मेपर्यंत २५७ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे किट्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, स्वतंत्र विभाग याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२०२० आणि २०२१ या दोन वर्षांत कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. हजारो रुग्णांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र शासनाने त्यावेळी वेगळे चौकशी पथकही पाठवले होते. या पार्श्वभूमीवर देशभरात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाच रुग्ण सापडू लागल्याने याबाबत प्राथमिक पूर्वतयारी करण्याच्या आणि दक्षता घेण्याच्या सूचना सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना देण्यात आल्या आहेत.