कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या तटबंदीला धोका; एक बाजू कोसळली, दुसरी बाजू उतरविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:54 IST2025-08-05T18:54:13+5:302025-08-05T18:54:56+5:30
सभोवतालची ११० झाडे तोडणार, मजबुतीकरणाचे काम सुरू

संग्रहित छाया
कोल्हापूर : येथील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाच्या मजबूत तटबंदीला धोका निर्माण झाल्यामुळे मैदानभर लावण्यात आलेली अशोकाची ११० झाडे तोडण्यास महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. यापैकी आठ झाडे काढून ती अन्यत्र लावण्यात आली आहेत, ती जिवंत राहतात का हे पाहून अन्य झाडे काढण्याची आणि अन्यत्र पुनर्ररोपण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या मालकीचे राजर्षी शाहू खासबाग मैदान संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे चर्चेत आले. तेथील दुरवस्था दिसून आल्या. आगीची घटना घडण्याआधीच सहा-सात महिन्यांपूर्वी मैदानाची दक्षिणेकडील तटबंदी कोसळून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळीही मैदानाच्या तटबंदीची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली होती. मैदानभर लावण्यात आलेल्या अशोकाची झाडे ही या तटबंदीला धोका निर्माण करीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही मैदानातील ११० झाडे काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यास वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा होऊन तोडण्यास मान्यता देण्यात आली. ही झाडे अन्यत्र पुनर्ररोपण करण्यात यावीत, अशी सूचनाही समिती सदस्यांनी केली. त्यानुसार एक महिन्यापूर्वी खासबाग मैदानाच्या उत्तर बाजूची भिंत कमकुवत झाल्यामुळे ती उतरविण्यापूर्वी आठ झाडे काढण्यात आली. यातील काही झाडे उद्यानात, तर काही झाडे नर्सरी बागेत लावण्यात आली आहेत. ती चांगली जगली आहेत.
पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची आणखी काही दिवस वाट पाहून मैदानावरील झाडे तोडण्याची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. सर्व झाडे महापालिका उद्यानातून लावण्यात येणार आहेत. कोणत्या ठिकाणी झाडे लावायची याचेही नियोजन उद्यान विभागाने केले आहे.
खासबाग मैदानाची तटबंदी अतिशय मजबूत होती. परंतु, चुकीच्या पद्धतीने उलटा अशोकाची झाडे मैदानभर लावण्यात आल्याने त्याची मुळे भिंतीत घुसल्याने तटबंदीला धोका निर्माण झाला होता. काही ठिकाणी तटबंदीला तडे गेल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे मैदानाला धोका निर्माण करणारी झाडे काढूनच टाकावीत, असा निर्णय प्रशासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतला आहे.
खासबाग कुस्ती मैदानविषयी
- बांधकाम प्रारंभ - १९०७
- उद्घाटन तारीख - २० एप्रिल १९१२
- पहिली कुस्ती - इमामबक्ष विरुद्ध मोईद्दीन – उद्घाटन दिवशी
- प्रेक्षक क्षमता - अंदाजे ३०,०००
- महत्त्व - भारतातील प्रसिद्ध कुस्ती आखाडा, सांस्कृतिक वारसा स्थळ
वारसा स्थळ -
खासबाग कुस्ती मैदान हे भारतातील कुस्तीची दिशा बदलणारे एक ऐतिहासिक स्थळ आहे. १९०७ मध्ये बांधकामास सुरुवात करून ते २० एप्रिल १९१२ रोजी उद्घाटन झाले आणि तेव्हापासून ते कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र ठरले आहे.