कोरोना संशयित शोधण्यासाठी मदत; कोल्हापूर हे देशातील पहिले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:02 IST2020-04-18T10:57:04+5:302020-04-18T11:02:10+5:30
कोल्हापूर : कोरोना संशयित शोधण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या ‘चॅटबॉट’ या लिंकवर शुक्रवारपर्यंत एकूण ६७ हजार जणांनी माहिती नोंदविली आहे. ...

कोरोना संशयित शोधण्यासाठी मदत; कोल्हापूर हे देशातील पहिले शहर
कोल्हापूर : कोरोना संशयित शोधण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या ‘चॅटबॉट’ या लिंकवर शुक्रवारपर्यंत एकूण ६७ हजार जणांनी माहिती नोंदविली आहे. परजिल्हा, राज्यांतून कोल्हापूरमध्ये आलेल्या ७५ हजार जणांपर्यंत ही लिंक पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर कोरोना संशयित कोणी असेल तर त्याला लवकरात लवकर शोधणे व त्याची तपासणी आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार हा ‘चॅटबॉट’ बनविण्यात आला आहे.
अन्य जिल्हा, राज्यांतून कोल्हापूरमध्ये सुमारे ८० हजार लोक आलेले आहेत. त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे; पण त्यांच्यापर्यंत सातत्याने त्यांची माहिती घेणे आणि त्यामधील कोणाला काही लक्षणे दिसल्यास त्यावर लगेच वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. त्याकरिता संबंधित ‘चॅटबॉट’ची मदत होत आहे. कोल्हापूरमध्ये दि. २७ मार्चपासून त्याचा वापर सुरू झाला. त्यामध्ये आतापर्यंत ६७ हजार जणांनी आपली माहिती नोंद केली आहे. अशा स्वरूपातील चॅटबॉटचा वापर करणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर असल्याची माहिती त्याचे विकसक (डेव्हलपर) विनायक पाचलग यांनी शुक्रवारी दिली.
माहिती भरून सहकार्य करावे
परजिल्हा, राज्यांतून कोल्हापूरमध्ये आलेल्या प्रत्येकाने आणि ज्यांना कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी http://www.kolhapurcollector.com/covid19 या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी. ही माहिती नोंदवून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाचलग यांनी केले आहे.