Kolhapur: हजारांवर बनावट एचएसआरपी नंबरप्लेट वाहनांवर, आरटीओ कार्यालय नेमके करते काय?
By सचिन यादव | Updated: February 14, 2026 11:59 IST2026-02-14T11:58:31+5:302026-02-14T11:59:03+5:30
खुलेआम केंद्रांकडे डोळेझाक, त्या वाहनधारकांना नोटिसा पाठविणार

संग्रहित छाया
सचिन यादव
कोल्हापूर : रेडियमच्या दुकानात हुबेहूब बनावट एचएसआरपी नंबरप्लेट तयार करून दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी अशा सुमारे एक हजार वाहनांना बसविल्या असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे येत आहे. साजणी (ता. हातकणंगले) येथे रेडियम कारागिराने हातोहात वाहनधारकांना गंडा घातला. खुलेआम ठिकठिकाणी ही एचएसआरपीची केंद्रे सुरू असताना प्रादेशिक परिवहन विभाग झोपला होता का, अशी तक्रार वाहनधारक करत आहेत. बोगस नंबरप्लेटची वाहने शोधायची कशी, असा प्रश्नही आरटीओ आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला पडला आहे.
परिवहन विभागाने सन २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले. त्यासाठी वाहनधारकांना सरकारच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करावी लागते. मात्र अनेकांनी ऑनलाइन नोंदणी करता येत नसल्याने ते खासगी केंद्रावर नोंदणीसाठी जातात. त्या ठिकाणी नोंदणीचा आणि एचएसआरपीच्या नंबरप्लेटसाठी आर्थिक लुटमार सुरू होते. सध्या शहरात ठिकठिकाणी एचएसआरपी नंबर प्लेट येथे बसवून दिल्या जातील, अशा जाहिराती केल्या आहेत. मात्र त्या अधिकृत किती आणि अनधिकृत किती आहेत, याची खातरजमा प्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जात नाही.
काय आहे प्रणाली?
परिवहन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://transport.maharashtra.gov.in आहे. या संकेतस्थळावरून एचएसआरपीची ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केलेल्या व्हेंडरकडून ही नंबरप्लेट बसविली जाते. त्यासाठी संबंधित केंद्राचा पत्ता, दिनांक आणि वेळ दिली जाते. ती बसविल्यानंतर त्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाच्या पोर्टलला केली जाते.
पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर डेटा तपासणार
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. तपासात पोलिस किती वाहनांना नंबरप्लेट बसविल्या आहेत. त्याचा अहवाल पाठविणार आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय त्याचा डेटा तपासणार आहे.
त्या वाहनधारकांना नोटिसा पाठविणार
अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी न करता खासगी केंद्रावरून एचएसआरपी नंबरप्लेट काही वाहनधारकांनी बसविली आहे. पोलिसांकडून आलेल्या अहवालानंतर त्या वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन अधिकारी नोटीस बजाविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भरारी पथक करते काय ?
शहरात गल्लीबोळात एचएसआरपी नंबरप्लेट बसवून दे्ण्याचे फलक झळकले आहेत. त्याची खात्री करण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने केले नाही. मुख्य व्हेंडरने ही उपकेंद्रे नेमल्याचा समज परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्यांना झाला. त्यामुळेच कारवाई केली नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
आरोपीकडे तपास सुरू आहे. बनावट एचएसआरपी तयार करण्यासाठी अजून कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे बहुतांशी वाहनधारकांना नंबरप्लेट बसविली असल्याची शक्यता आहे. - नानासाहेब पवार, सहायक पोलिस निरीक्षक, हातकणंगले
विभागाने अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणीचे आवाहन केले आहे. मात्र वाहनधारक खात्री न करता कोणत्याही दुकानांतून ही नंबरप्लेट बसवितात. बनावट नंबरप्लेटच्या कोडिंगमध्ये साधर्म्य नसल्यास त्या वाहनाचे कार्यालयाशी संबंधित कोणतेही काम केले जाणार नाही. - चंद्रकांत माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी