कोल्हापुरातून पळून गेलेल्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:48+5:302021-04-05T04:21:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरातील एकाही विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाही, म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याला ...

कोल्हापुरातून पळून गेलेल्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलू नये
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरातील एकाही विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाही, म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याला पळून गेले. अशा व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलू नये, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कोरोनामुळे ५५ हजार बालके बाधित झाली, अशा परिस्थितीत भाजपच्या मंडळींनी राजकारण थांबवावे, असेही त्यांनी म्हटले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनी भाष्य करीत आजारपणाला वाझे प्रकरणाशी जोडले होते, त्याबाबत जिंदाल यांनी माफी मागावी, अशी आपण मागणी केली होती. माफी राहिली बाजूलाच चंद्रकांत पाटील हे जिंदाल काय चुकीचे बोलले असे समर्थन करीत आहेत. त्यांना इतकी घमेंड कोठून आली? ते अतिशय भित्रे आहेत, कोल्हापुरातील एकाही विधानसभेच्या जागेवर उभारण्याची त्यांची ताकद नसल्यानेच ते पुण्याला पळून गेले. अशांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीवर बोलणे योग्य नाही.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालके बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही.
देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील असोत, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करू देत, महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार आहे. अशा घटनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.