कोल्हापूर जिल्ह्यात तेरा नगरपालिका, नगरपंचायतींत तब्बल ४ हजार दुबार मतदार, तातडीने पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:41 IST2025-11-05T12:40:35+5:302025-11-05T12:41:57+5:30
Local Body Election: दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाही, पण...

संग्रहित छाया
कोल्हापूर : दुबार मतदारांवरून देशात रणकंदन माजले असताना, जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींमधून ४ हजार १५० मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना या मतदारांची यादी पाठवण्यात आली असून बीएलओंमार्फत तातडीने त्याची पडताळणी करण्यास सांगितले आहे.
नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजल्याने स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली असली, तरी नगरपालिका, नगरपंचायतींच्या विभागाला मतदार यादीतील दुबार नावांचा ताण आहे. निवडणूक आयोगाने सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात, एकच प्रभाग आणि एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबवण्यास सांगितले आहे.
वाचा: १३ नगरपालिकांमध्ये राजकीय संघर्ष सुरु; नेत्यांसह मतदारांचाही लागणार कस
कशी करणार पडताळणी
ही यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका प्रभागातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेतला जाईल. अन्य ठिकाणी त्यांचे नाव असेल तर त्यापुढे स्टारचे चिन्ह असेल. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना हा दुबार मतदार असल्याचे लक्षात येईल.
तीन पर्याय
- दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड.
- एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल, तर एका केंद्राची निवड.
- वरील दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल, तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का. मतदार मतदानासाठी आला, तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले जाईल, अशा तीन पातळींवर हे काम चालेल.
मतदार यादीत नाव असणारच..
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. महिन्याभरात निवडणूक असल्याने एवढ्या कमी वेळेत दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाही. फक्त नावापुढे दुबारचे चिन्ह असेल. निवडणूक झाली की ही नावे मतदार यादीतून वगळली जातील.
एक-एक मत महत्त्वाचे असल्याने....
स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये चुरस जास्त असते, मतदारांची संख्या कमी असते त्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे असते. पोलिंग एजंट डोळ्यात तेल घालून असतात. एक जरी दुबार मतदार आढळला किंवा एकाने अन्य ठिकाणीदेखील मतदान केले, तर लगेच त्यावर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची संख्या कमी असते.
नगरपालिका : दुबार मतदार संख्या
- जयसिंगपूर : १४८९
- गडहिंग्लज : ७७०
- हुपरी : ५१३
- कागल : ३५८
- शिरोळ : ३०४
- आजरा : २१५
- वडगाव : १५३
- कुरुंदवाड : १४९
- हातकणंगले : १०५
- चंदगड : ३८
- मुरगूड :३३
- मलकापूर : १६
- पन्हाळा : ७
- एकूण : ४ हजार १५०