Shiv Jayanti 2025 Special: कोल्हापूर जिल्ह्यात होत्या आठ शिवकालीन टांकसाळी, उत्खननाची गरज 

By संदीप आडनाईक | Updated: April 29, 2025 12:47 IST2025-04-29T12:44:44+5:302025-04-29T12:47:03+5:30

Shiv Jayanti 2025 Special: आर्थिक व्यवस्थेवर पडेल प्रकाश

There were eight Shiva era mints in Kolhapur district, need for excavation | Shiv Jayanti 2025 Special: कोल्हापूर जिल्ह्यात होत्या आठ शिवकालीन टांकसाळी, उत्खननाची गरज 

पन्हाळगडावरील अंबरखाना येथील याच धान्यकोठारासमोरील जमिनीखाली शिवकालीन टांकसाळ अस्तित्वात आहे

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूरसह बावडा, कागल, कापशी, मलकापूर, निपाणी, पन्हाळा आणि विशाळगड या आठ ठिकाणी शिवकालीन टांकसाळ (नाणी बनवण्याची जागा) चालविल्या जात होत्या. काळाच्या उदरात यातील अनेक जागा जमिनीखाली लुप्त झाल्या आहेत.

पन्हाळगडावरील टांकसाळीची जागा ज्येष्ठ इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी शोधून त्यावरचा प्रबंध इतिहास संशोधन मंडळात प्रसिद्धीसाठी पाठवला होता. काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या या जागांचे उत्खनन केल्यास मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था कशी चालत होती यावर आणखीन माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

मराठा साम्राज्यात, टांकसाळी नाणी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक होत्या, आणि त्या माध्यमातून मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था चालत होती. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यासाठी नाणी बनवण्यासाठी टांकसाळी स्थापन केल्या. रायगडावर टांकसाळ स्थापन करून मराठा चलनाची सुरुवात केली, आणि कालांतराने, त्यांनी इतर ठिकाणीही टांकसाळी स्थापन केल्या. त्यात पन्हाळगडावर शिवकालीन टांकसाळीचाही समावेश आहे. पन्हाळगड हे एक महत्त्वाचे ठिकाण होते आणि तिथेही टांकसाळ असणे स्वाभाविक होते. 

पन्हाळगडावरील अंबारखाना येथील धान्य कोठारासमोर टांकसाळ असल्याचा शोध स्व. इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी लावला होता. अंबारखाना म्हणजेच पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा आणि प्रकाश खेळण्यासाठी झरोके आहेत. या शेजारी भूमिगत कोठारामध्ये शस्त्रसाठा आणि चांदीची नाणी तयार करण्याची टांकसाळ होती. याला पन्हाळी रुपया म्हणून ओळखले जात होते.

पन्हाळगडाला महत्त्व..

महाराष्ट्राच्या इतिहासात पन्हाळगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत म्हणजेच इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात पन्हाळगड बांधला. या किल्ल्याला वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला आहे. कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा किल्ला आजही भक्कमपणे उभा आहे आणि या किल्ल्यावर आजही वस्ती आहे. कोकण आणि घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणारे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमुळे नेहमीच गजबजलेले असते.

Web Title: There were eight Shiva era mints in Kolhapur district, need for excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.