Kolhapur: ‘भुदरगड’च्या १५ कोटीच्या मालमत्ता विक्रीला प्रतिसादच मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:27 IST2025-04-16T12:27:25+5:302025-04-16T12:27:50+5:30
‘उत्तूर’च्या मालमत्तेची केवळ विक्री : नव्याने निविदा काढावी लागणार

Kolhapur: ‘भुदरगड’च्या १५ कोटीच्या मालमत्ता विक्रीला प्रतिसादच मिळेना
राजाराम लोंढे
कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीसाठी काढलेल्या १५ कोटी ९७ लाख रुपयांच्या किमतीच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. नऊपैकी उत्तूर (ता. आजरा) येथील मालमत्तेची विक्री झाली, उर्वरित आठ मालमत्ता तशाच राहिल्या आहेत. अवसायक मंडळाला सहकार विभागाच्या मान्यतेने नव्याने विक्री प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रतिसाद का मिळाला नाही? याची कारणे शोधून राखीव किंमत (अपसेट प्राइज) कमी करता येईल का? याचाही विचार करावा लागणार आहे.
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेली भुदरगड पतसंस्था सध्या अवसायनात काढली असून, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कामकाज सुरू आहे. थकबाकीदारांची वसुली सुरू असताना ठेवीदारांना वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जात आहे.
संस्थेकडे असलेल्या मालमत्तांची विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. विविध ठिकाणावरील नऊ मालमत्तांची विक्रीसाठी जाहीर निविदा डिसेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही, केवळ उत्तूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेची विक्री झाली. या मालमत्तेची किमान किंमत १ कोटी ५७ लाख ४७ हजार निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यापेक्षा अधिक म्हणजेच १ कोटी ९४ लाख रुपयांना विक्री करण्यात आली.
बारा संचालकांच्या मालमत्तांवर बोजा
पतसंस्थेच्या ४८ संचालक व अधिकाऱ्यांवर ४६ कोटींची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यातील १६ कोटीसाठी १२ जणांच्या मालमत्तांवर बोजा चढवण्यात आला आहे. यामध्ये सात संचालक व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
येथील मालमत्तांना मिळेना प्रतिसाद..
मालमत्ता - राखीव किंमत
- पिंपरी चिंचवड ७५०० चौरस फूट - ५,२६,५०,०००
- गारगोटी येथील आरसीसी इमारत - ३,३६,४०,०००
- गारगोटी बाजारपेठ इमारत - १,३३,९७,०००
- गारगोटी ग्रामपंचायत हद्दीतील २४ हजार चौरस फूट २,७४,०१,०००
- पिंपळगाव येथील आरसीसी इमारत - २७,३५,०००
- आजरा येथील तीन मजली इमारत - ९१,१९,०००
- कुडाळ येथील मालमत्ता - २५,६७,०००
- कुडाळ येथील ९०३ चौरस फूट - २५,२६,०००
भुदरगडच्या मालमत्ता विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा विक्री निविदा काढणे ही प्रक्रियेचा भाग असतो, त्याप्रमाणे प्रक्रिया राबवली जाईल. - डॉ. महेश कदम (अवसायक व विभागीय सहनिबंधक, काेल्हापूर)