मराठा आरक्षणाला कोणताही धोका नाही : मोघे
By Admin | Updated: June 27, 2014 01:19 IST2014-06-27T01:17:47+5:302014-06-27T01:19:43+5:30
शानदार सोहळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांचे ५५ व्यक्ती व १० संस्थांना वितरण

मराठा आरक्षणाला कोणताही धोका नाही : मोघे
कोल्हापूर : मराठा आरक्षणाला कोणताही धोका नसल्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे आज, गुरुवारी दिली. मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सांस्कृतिक मंदिरात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वितरण शानदार सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथविधी समारंभामुळे अनुपस्थित राहिले.
यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, खासदार धनंजय महाडिक, आदी मान्यवर उपस्थित होते. ५५ व्यक्ती व १० संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व व्यक्तींसाठी रोख १५ हजार रुपये व संस्थेसाठी २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मंत्री मोघे म्हणाले, ‘राज्य सरकारने काल, बुधवारी मराठा व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर आता हे आरक्षण टिकेल की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे; परंतु ती निराधार असून, राज्य शासनाने त्यासंबंधीचा आवश्यक तो कायदेशीर अभ्यास करूनच हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या विविध जाती समूहांसाठी असलेल्या ५२ टक्के आरक्षणाशिवाय हे वेगळे आरक्षण दिले आहे. सच्चर आयोगाच्या शिफारशीवरून मुस्लिम समाजाला आरक्षण दिले आहे. ’
पालकमंत्री पाटील म्हणाले, समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे काम सामाजिक न्याय विभागाने केले. ११ हजार कोटी सामाजिक विभागाला मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गाच्या विविध योजनांसाठी शासनाने दिले आहेत.
राज्यमंत्री सावकारे म्हणाले, ‘मागासलेपणा हा प्रत्येक जातीत व समाजात असतो. तो दूर करून शैक्षणिक प्रवाहात आणणे ही शासनाची जबाबदारी आहे.’
यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचेही भाषण झाले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. समाज कल्याण आयुक्त रणजितसिंह देओल यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ, शुभदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)