निधीसाठी पालकमंत्र्यांना दहावेळा विनंती करून साधी बैठकही नाही : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:53 IST2018-12-04T00:53:44+5:302018-12-04T00:53:48+5:30
कोल्हापूर : शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शहराच्या विकासासाठी जादा निधी मिळवून द्यावा याकरिता चर्चा करून निर्णय घ्यावा ...

निधीसाठी पालकमंत्र्यांना दहावेळा विनंती करून साधी बैठकही नाही : सतेज पाटील
कोल्हापूर : शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शहराच्या विकासासाठी जादा निधी मिळवून द्यावा याकरिता चर्चा करून निर्णय घ्यावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मी स्वत: दहा वेळा विनंती केली; पण त्यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. निधी मिळाला नसल्यामुळे शहरात विकासकामे झालेली नाहीत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे खंत बोलून दाखविली. अशीच खंत आमदार हसन मुश्रीफ यांनीही व्यक्त केली.
कॉँग्रेस - राष्टÑवादी आघाडीतील नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेत सत्ता टिकविण्याचे काम आम्ही केले; मात्र राज्यात व देशात भाजपचे सरकार आले. त्यामुळे विकासकामे करण्यात खूपच अडचणी येत आहेत. . त्यामध्ये आम्ही आणलेल्या थेट पाईपलाईनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. त्याकरिता किमान २५ कोटींचा निधी राज्य सरकारने द्यावा, तसेच एलबीटीच्या वाढीव उत्पन्नाचा काही भाग पालिकेलाही मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.
आमदार मुश्रीफ यांनीही हाच धागा पकडून शहरातील रखडलेल्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता आम्ही विधानसभेच्या दारात उभे राहून आंदोलन केले; मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणी काय फक्त कॉँग्रेस-राष्ट्रवादीला
थेट पाईपलाईन हे एक आमचे स्वप्न होते. योजना मंजूर झाल्यानंतर त्याचे काम गतीने होणे आवश्यक होते; पण सरकारचीच अनेक खाती अडचणी निर्माण करीत आहेत. ही योजना पूर्ण झाल्यावर केवळ कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभागांतच पाणी मिळणार आहे आणि भाजप - ताराराणीच्या प्रभागांत मिळणार नाही असे काहीच नाही. सर्वांनाच पाणी मिळणार आहे, असे आमदार पाटील म्हणाले.