मुश्रीफांच्या कारखान्यात एकही शेतकरी सभासद नाही, समरजीत घाटगेंचा खळबळजनक आरोप
By समीर देशपांडे | Updated: February 25, 2023 13:57 IST2023-02-25T13:56:34+5:302023-02-25T13:57:43+5:30
कागदोपत्री मुश्रीफ यांच्या घरातील सदस्य आणि कंपन्या अशा एकूण सतरा जणांच्या मालकीचा हा कारखाना

मुश्रीफांच्या कारखान्यात एकही शेतकरी सभासद नाही, समरजीत घाटगेंचा खळबळजनक आरोप
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी कारखाना उभारणी करण्यासाठी ४० हजार शेतकऱ्यांकडून ४० कोटी रुपये गोळा केले. परंतु यातील एकाही शेतकऱ्याला त्यांनी सभासदच केले नाही असा खळबळजनक आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि शाहू समूहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची शृंखला सुरू असून त्यातच घाटगे यांनी हा नवा आरोप केला आहे.
ते म्हणाले, मुश्रीफ यांनी गावोगावी फिरून, मेळावे घेऊन चाळीस हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे ४० कोटी रुपये गोळा केले. परंतु पब्लिक लिमिटेड कंपनी संदर्भातील सर्व माहिती घेतली असता कागदोपत्री मुश्रीफ यांच्या घरातील सदस्य आणि कंपन्या अशा एकूण सतरा जणांच्या मालकीचा हा कारखाना आहे.
त्यामुळे या चाळीस हजार शेतकऱ्यांची मुश्रीफ यांनी घोर फसवणूक केली असून या शेतकऱ्यांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावे. सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एक तरी सर्वसाधारण सभा झालेली किंवा शेतकऱ्यांना अहवाल पाठवलेले मुश्रीफ यांनी दाखवून द्यावे असे आव्हानही घाटगे यांनी यावेळी दिले.