कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे विषबाधा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी घेतलेल्या खिरीचा अहवाल आला असून, त्यामध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. पाण्याचा अहवाल अद्याप बाकी असून, या अहवालानंतरच विषबाधा कशातून झाली, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पाणी तपासणी अहवालाकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.शिवनाकवाडी येथील कल्यानताई यात्रेमध्ये महाप्रसादानंतर सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली होती. ६ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. यामध्ये बाळासो सदू आरगे (वय ६२) या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली होती.या घटनेनंतर विषबाधा नेमकी कशातून झाली, याचा शोध घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादाचे खिरीचे अन्न व वापरण्यात आलेल्या पाण्याचे नमुने घेतले होते. तब्बल एक महिन्यानी खीर तपासणीचा अहवाल आला असून त्यामध्ये कोणताही दोष नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचा अहवाल अद्याप येणार असून, त्याच्या अहवालाकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.
महाप्रसादातील खिरीचे अन्न आणि पाणी तपासणीसाठी घेतले होते. खिरीचा अहवाल प्रमाणित असून पाण्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. - प्रदीपा फावडे, अन्न व औषध प्रशासन सहायक संचालक, कोल्हापूर