कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज कामात घोटाळाच, प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:58 IST2025-08-02T11:57:55+5:302025-08-02T11:58:18+5:30
माझी सहीच नाही म्हणणारे पोलिसात का जात नाहीत ?

कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज कामात घोटाळाच, प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट
कोल्हापूर : कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते रेणुसे, रेडेकर, बडबडे मळ्यापर्यंत ड्रेनेज पाईप टाकण्याच्या कामात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे शुक्रवारी दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ८५ लाखांचे बिल काम न करता काढून घोटाळा केल्याचा आरोप झाला होता. यातील प्रत्यक्षात काम किती झाले आणि काम न करता बिल किती दिले, याचा शोध महापालिकेने घेतलेला नाही. त्यामुळे यासंबंधीची नेमकी माहिती शहर अभियंता रमेश मस्कर यांनी रात्री उशिरापर्यंत दिली नाही.
माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी काम न करता ८५ लाखांचे बिल ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी उचलल्याचा आरोप केला. त्यानंतर ठेकेदार वराळे यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची टक्केवारीच चव्हाट्यावर आणली. महापालिकेने ठेकेदार वराळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल तयार झाला. तो अहवाल शुक्रवारी प्रशासकांकडे प्राप्त झाला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, अहवाल मिळाला आहे.
मात्र अजून त्याचा सखोल अभ्यास केलेला नाही. या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य आहे. बिल जितके घेतले आहे, तितके काम झालेले नाही. जबाबदार अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करण्यापासून ते बिल देण्यापर्यंतच्या प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी राखल्याचे समोर आले आहे. म्हणूनच काही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे. सेवानिवृत्त झालेल्यांचे लाभ रोखण्यासंबंधीची कारवाई सुरू आहे. कनिष्ठ स्तरावरील दोन कर्मचारीही दोषी आहेत. त्यांच्यावरही कारवाई होईल. डिजिटल सह्यांची फेरपडताळणी करण्यात येणार आहे.
लाचेचा आरोप असलेल्याच फिर्यादी असल्याने
ठेकेदार वराळे यांनी ८० हजार रुपयांची टक्केवारी गुगल पे वरून घेतल्याचा आरोप असलेल्या प्रज्ञा गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. म्हणून या गुन्ह्यात महापालिकेच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जबाबाची जोड देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या सह्यांची पडताळणी फॉरेन्सिक लॅबमध्ये झाल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.
माझी सहीच नाही म्हणणारे पोलिसात का जात नाहीत ?
तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे यांनी या प्रकरणातील कामावर माझ्या सह्याच नाहीत, असा लेखी खुलासा दिला आहे. मात्र यांनी सह्यांची पडताळणी करावी, अशी तक्रार अजूनपर्यंत पोलिसात केलेली नाही. यामुळे घोटाळ्यातील बिलावरील सह्या त्यांच्याच आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.