महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:10 IST2025-08-09T05:10:26+5:302025-08-09T05:10:41+5:30
पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे.

महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी’ हत्तीणीच्या (माधुरी) पुनर्वसनाच्या हालचालींमध्ये पेटा इंडिया या प्राणी संरक्षण संस्थेच्या नव्या पत्रातून महाराष्ट्रात वन्य हत्तींच्या उपचार व पुनर्वसनासाठी आवश्यक दर्जाच्या सुविधा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, याबाबत नांदणी मठाच्या वकिलांनी पेटा या संस्थेचा हा मुद्दा खोडून काढला आहे.
पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे. महादेवीला शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक-मानसिक पुनर्वसनासाठी अनुकूल जागा मिळवून देणं हा आमचा एकमेव हेतू आहे, महाराष्ट्रात तिला पाठवण्याला आमचा विरोध नाही पण
महाराष्ट्रात वनताराच्या तोडीच्या सुविधा नसल्याने तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र पेटाच्या ताज्या भूमिकेला मठाच्या वकिलांनी उत्तर दिले आहे. पेटाच्या म्हणण्यानुसार, महादेवीच्या पुनर्वसनासाठी शांत परिसर, मुबलक पाणी, तज्ज्ञ वैद्यकीय सेवा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्याला वनतारा सहकार्य करणार असल्याने पेटाचा या मुद्याचा प्रश्नच येणार नसल्याचे वकील मनोज पाटील यांनी सांगितले आहे.
वन तारा नको तर कर्नाटकात पाठवा -
पेटाच्या मते, महाराष्ट्रात योग्य सुविधा नसल्याने महादेवीला वनतारा (गुजरात) येथेच ठेवणं हितावह ठरेल. तसेच उत्तर प्रदेशातील ‘Wildlife SOS’ किंवा कर्नाटकमधील ‘Wildlife Rescue and Rehabilitation Centre’ येथे तिला सुरक्षित व आरोग्यपूर्ण निवृत्ती मिळू शकते, तर त्या ठिकाणी पाठवण्यासही ते तयार आहेत.
पुनर्वसन हाच एकमेव उद्देश
दरम्यान, हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्यास ते योग्य निर्णय देतील असा विश्वास पेटाने याच पत्रात व्यक्त केला आहे.