अमेरिकेला आवडतो कोल्हापुरी गूळ.. टॅरिफमुळे होणार निर्यातीत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:35 IST2025-08-02T12:34:39+5:302025-08-02T12:35:25+5:30
अमेरिकत ५०० क्विंटलपेक्षा अधिक गूळ होतो निर्यात

अमेरिकेला आवडतो कोल्हापुरी गूळ.. टॅरिफमुळे होणार निर्यातीत घट
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील गुळाला जगभरातील अनेक देशांची मागणी आहे. कोल्हापूरच्या गुळाला सर्वाधिक मागणी असणाऱ्या अमेरिकेने आयात शुल्क (टॅरिफ) लागू केल्याने अमेरिकेत कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा काहीसा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोल्हापूरच्या गुळाची चव इतर राज्यातील, देशांमधील गुळापेक्षा वेगळी असल्याने येथील गुळाला मोठी मागणी आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी दीड लाख किलो गूळ निर्यात केला जातो. यापैकी एकट्या अमेरिकत ५०० क्विंटलपेक्षा अधिक गूळ निर्यात होतो. येथे गुळाला पूर्वीपासून शंभर टक्के आयात शुल्क आकारले जाते.
मात्र, डोनाल्ड ट्रम्प सरकारने यावरही अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने अमेरिकेत कोल्हापुरी गूळ महाग होणार आहे. आयात शुल्कामुळे महाग झालेल्या कोल्हापुरी गुळाची मागणी घटण्याची भीती कोल्हापुरातील गूळ व्यापाऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे हे अतिरिक्त आयात शुल्क रद्द करावे, अशी मागणी या व्यापाऱ्यांमधून होत आहे.
कोल्हापूरसाठी अमेरिका का महत्त्वाची?
प्रत्येक वर्षी गूळ हंगामात दीड लाख किलोपेक्षा जास्त गूळ परदेशात निर्यात केला जातो. यापैकी एकट्या अमेरिकेत ५०० क्विंटलपेक्षा जास्त तो निर्यात केला जातो. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ही मागणी वाढत आहे. त्यामुळे गुळाच्या बाबतीत अमेरिका हा देश कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, या २५ टक्के अतिरिक्त शुल्कामुळे गुळाची मागणी घटण्याची भीती आहे.
कोल्हापुरातून ५० हजार किलाेपेक्षा जास्त गूळ अमेरिकेत निर्यात केला जातो. तेथे यापूर्वी गुळावर शंभर टक्के आयात शुल्क होतेच. पण, आता त्यावरही २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावल्याने गूळ महाग होऊन मागणी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अतिरिक्त आयात शुल्क रद्द करावे. - निमिष वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर