कळे : दारूच्या नशेत पुष्पा स्टाइल वाहन चालवणाऱ्या एका टँकरचा नाकाबंदीदरम्यान कळे पोलिसांना सामना करावा लागला. गाडीत बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला धमकावत घेऊन जाण्याची आगळीक संबंधित टँकरचालकाने केली. ही घटना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टँकरचालक दस्तगीर दाऊद खान (वय ६४, रा. प्रिन्स राजाराम कॉलनी, ए. वार्ड, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल अंकुशराव भिकाजी शेलार यांनी फिर्याद दाखल केली आहे.घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील कळे येथे दस्तुरी चौक परिसरात नाकाबंदी सुरू होती. दरम्यान, दस्तगीर खान दुधाचा टँकर घेऊन कोल्हापूरहून साळवाडी (ता. पन्हाळा) येथील गोकुळच्या दूध शीतकरण केंद्रावर निघाला होता. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरून येताना तो पुष्पा स्टाइल नागमोड्या पध्दतीने वेडेवाकडे वाहन चालवत बेदरकारपणे येत होता. काही वाहनधारकांनी नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या कळे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी टँकर थांबविण्याचा इशारा केला, तरीही दस्तगीरने टँकर पुढे रेटला. पोलिसांनी पाठलाग करून टँकर थांबवला. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी टँकर पोलिस ठाण्याकडे घेण्याचा आदेश दिला. कॉन्स्टेबल अंकुश शेलार त्या टँकरमध्ये बसले. दस्तगीरने टँकर पोलिस ठाण्याऐवजी कळे-बाजार भोगाव मार्गाकडे वळविला व गाडीत बसलेले कॉन्स्टेबल अंकुश शेलार यांच्यासह भरधाव वेगाने निघाला. शेलार यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.पोलिसाला धमकावले‘मेलो तर दोघेही.. तुला सोबत घेऊनच मरणार’ अशी धमकी दस्तगीरने कॉन्स्टेबल शेलार यांना दिली. दरम्यान, शेलार यांनी दस्तगीरला चोप दिला व गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समोरून उसाची ट्रॉली भरून ट्रॅक्टर व इतर वाहने येत होती. तरीही दस्तगीर वाहन थांबवेना. शेवटी शेलार यांनी समयसूचकता दाखवत ‘मी गाडीतून उतरतो, तू टँकर घेऊन जा’ असे सांगून खाली उतरण्याचे व पायात पडलेला मोबाइल चालण्याचे नाटक केले. यादरम्यान, शेलार यांनी गाडी न्यूर्टल करून दस्तगीरवर झडप घातली व टँकर थांबविला. पाठोपाठ पोलिस गाडीतून सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे आले. दस्तगीरला वाहनातून बाहेर खेचून रट्टे दिले.दस्तगीरची बनवाबनवीप्रसंगादरम्यान, दस्तगीरची नशा उतरली. तो इंग्रजी व मराठीतून बोलू लागला. आपले खरे नाव, पत्ता सांगत नव्हता. आपली चूक झाली असे सांगत हात जोडून विनंती करू लागला. त्याने आपले नाव विलास हिंदुराव पाटील (रा. पोहाळे तर्फ बोरगाव) असे सांगितले. तो खोटं बोलत असल्याने त्याचा मोबाइल ताब्यात घेऊन त्याच्या नातेवाइकांना बोलावून घेतले.
Kolhapur: कळेजवळ टँकरचालक अन् पोलिसांच्या पाठलागाचा थरार, नाकाबंदीदरम्यान घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:19 IST