Kolhapur: शिक्षकाने बदलीचा अर्ज केला; दुसऱ्याने परस्पर उडवला!; संशयित सायबर केंद्र चालकावर गुन्हा
By समीर देशपांडे | Updated: July 12, 2023 14:44 IST2023-07-12T14:43:09+5:302023-07-12T14:44:25+5:30
केंद्र चालक आंबिटकर यांना कोणी भरीस पाडले

Kolhapur: शिक्षकाने बदलीचा अर्ज केला; दुसऱ्याने परस्पर उडवला!; संशयित सायबर केंद्र चालकावर गुन्हा
समीर देशपांडे
कोल्हापूर : एका प्राथमिक शिक्षकानेबदलीसाठी केलेला अर्ज परस्पर दुसऱ्याने मागे घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चंदगड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान म्हणजेच सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकार असल्याचे सांगण्यात आले.
तुकाराम महादेव कदम हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी गावचे. ते गेली २५ वर्षे चंदगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक आहेत. ते आता बदलीपात्र असल्याने त्यांनी अडकूर, ता. चंदगड येथील आशुतोष आंबिटकर यांच्या आधार सेवा केंद्रातून बदलीसाठी ऑनलाइन संबंधित पोर्टलवर अर्ज केला. यासाठी त्यांनी आपला मेल आयडी, पासवर्ड, शाळेचा युडायस क्रमांक आंबिटकर यांना दिला.
आपल्याच तालुक्यात नोकरीला जाण्यासाठी त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर, गिजवणे, येणेचंवडी, कडलगे या गावांचा प्राधान्यक्रम भरला. अन्य तालुक्यांतील २६ शाळांचीही मागणी केली. त्यांनी या अर्जाची प्रिंट आऊट आणि मोबाइलवरील स्क्रीनशॉट काढून ठेवला. अशातच फेब्रुवारी २०२३ मध्ये कदम यांची शाहूवाडी तालुक्यात बदली केल्याचा आदेश मिळाला. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत येऊन विचारणा केली की, मी शाहूवाडी तालुका मागितला नसताना मला तो मिळाला कसा. मग चौकशी सुरू झाली आणि अखेर कदम यांच्या अपराेक्ष त्यांचा अर्ज दुसऱ्याच कोणी मागे घेतल्याचे स्पष्ट झाले.
आंबिटकर यांना कोणी भरीस पाडले
जेव्हा कदम यांनी गडहिंग्लज तालुक्यातील वरील गावे बदलीसाठी मागितली. तेव्हा गडहिंग्लजमधील काही जणांनी त्यांना फोन करून तुम्ही आहे तिथेच राहा. इकडे कशाला येताय, असा फोन केला होता. त्यानंतर हा अर्जच परस्पर उडवण्यात आला. हे करणे फक्त सेवा केंद्र चालक आंबिटकर यांनाच शक्य असल्याने कदम यांनी त्यांच्याविरोधात २५ एप्रिल २०२३ रोजी चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ज्यानुसार आंबिटकर यांच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत चार कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेब्रुवारीपासून फेऱ्या
कोणतीही चूक नसताना कदम हे आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कोल्हापूरला फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे त्यांनी अर्ज केल्याचे गृहीत धरून त्यांची बदली व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे केली आहे.