देशात संविधान टीकणार की नाही अशी स्थिती, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; आमदार अपात्रतेबाबत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 17:30 IST2024-01-09T17:25:31+5:302024-01-09T17:30:14+5:30
संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास ४० गद्दार अपात्र होतील

देशात संविधान टीकणार की नाही अशी स्थिती, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; आमदार अपात्रतेबाबत म्हणाले..
कोल्हापूर : देशामध्ये संविधान टीकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आमदार अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास ४० गद्दार अपात्र होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर कडाडून टीका केली. न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवला जात आहे. हे सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापुरात आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे हलगीच्या ठेक्यावर जल्लोषात स्वागत केले. शहरात मिरजकर तिकटी येथे सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे.