मालिकांतील फसवणुकीचा ‘सीन’ प्रत्यक्षात!; चित्रीकरण झाले, पैसे न देताच निर्मिती संस्था गायब
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 12, 2023 13:07 IST2023-08-12T13:07:23+5:302023-08-12T13:07:44+5:30
मराठी मालिका व चित्रपट व्यवसायाला फसवणुकीचे ग्रहण

मालिकांतील फसवणुकीचा ‘सीन’ प्रत्यक्षात!; चित्रीकरण झाले, पैसे न देताच निर्मिती संस्था गायब
इंदुमती गणेश
कोल्हापूर : टीव्ही मालिका, वेब सिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्म या क्षितिजावर विस्तारलेल्या मराठी मालिका व चित्रपट व्यवसायाला फसवणुकीचे ग्रहण लागले आहे. करारपत्र असूनही अनेक निर्मिती संस्था निर्मिती व्यवस्थापकांना ठरलेली रक्कम न देताच निघून जातात. महिनोन्महिने पेमेंट न झाल्याने साहित्य पुरवठादार व्यावसायिक व विशेषत: ज्युनिअर आर्टिस्टसह कामगार अडचणीत आले आहेत. निर्मिती व्यवस्थापकांवर तक्रारी, कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ आली आहे.
सध्या राज्यात मराठी चित्रपटांच्या बरोबरीने मराठी मालिका, वेब सिरीजचे चित्रीकरण होत आहे. कोल्हापूर चित्रनगरीत सध्या दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण होते. निर्मिती संस्थांना चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य व ज्युनिअर आर्टिस्ट पुरवण्याचे काम निर्मिती व्यवस्थापक व्यक्ती किंवा संस्था करतात. त्यासाठी आधीच करारपत्र करून बजेट ठरवले जाते. चित्रीकरण पार पडते, पण संबंधित संस्था पैसे न देताच किंवा ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन निघून जात आहेत. महिनोन्महिने तगादा लावूनही पैसे देत नाहीत, असा व्यावसायिकांचा अनुभव आहे.
तीन महिने क्रेडीट बंद करा..
पूर्वी चित्रीकरण झाले की पैसे दिले जात होते. पण, चॅनलवाले तीन महिन्यांनी रक्कम देतात त्यामुळे आपणही तीन महिन्यांनी बिले देऊ अशी पद्धत निर्मिती संस्थांनी सुरू केली आहे. आता तर तीन महिने लोटूनही रक्कम मिळत नाही. पण, दाद कुणाकडे मागायची हे कळत नसल्याने व्यावसायिक स्वत:च्या पातळीवरच धडपडतात. काहीवेळा पैसै मिळतात, काहीवेळा बुडता; त्यामुळे होणारा मनस्ताप वेगळा.
तक्रार, कोर्ट-कचेऱ्या
एका नामांकित सिनेव्यावसायिकाने काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचे चित्रीकरण केले. ४० लाखांवर रक्कम अडकली. वारंवार पाठपुरावा केल्यावर ३० लाख मिळाले अजून १५-१६ लाख अडकले आहेत. एका चॅनलचाही असाच अनुभव आला आहे. असाच अनुभव अनेक साहित्य पुरवठादार संस्थांना सिनेसर्व्हिस देणाऱ्यांना येत आहे.
वसुली न झाल्याने यात निर्मिती व्यवस्थापक भरडले जातात. तंत्रज्ञ, कलावंतांची आर्थिक कोंडी होते. याचा चित्रपट महामंडळाने गांभीर्याने विचार करावा. - मिलिंद अष्टेकर
महामंडळाच्या नव्या घटनेत दूरचित्रवाणीचाही समावेश केला आहे. काही कारणाने त्यावर धाेरणात्मक निर्णय घेता आला नाही. पण, आता बैठकीत तज्ज्ञ समिती नेमून आचारसंहिता तयार करू. ती सर्वांनी पाळली पाहिजे यासाठी चित्रपट महामंडळ पाठपुरावा करेल. - मेघराज भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ